बीड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; 14 लघु प्रकल्प कोरडे, 71 प्रकल्प मृतसाठ्यात

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

News Photo   2026 06 16T135247.108

बीड जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाला (Beed) विलंब होत असून जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जिल्ह्यावर संभाव्य पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. धरणे, लघु प्रकल्प आणि जलसाठ्यांमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने प्रशासनासह शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांमधील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत घसरला आहे. जिल्ह्यातील १४ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून तब्बल ७१ प्रकल्प मृतसाठ्यावर पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी उपयुक्त पाणीसाठा अत्यल्प शिल्लक राहिल्याने आगामी काही आठवडे निर्णायक ठरणार आहेत. यंदा मान्सूनच्या प्रारंभी अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या तयारीवरही परिणाम होऊ लागला आहे.

बीडच्या आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण; अल्पवयीन मुलीसाठी आईचं आमरण उपोषण

अनेक भागांतील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली असली तरी पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. धरणे आणि लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्यात सातत्याने घट होत असल्याने ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल आणि शेततळ्यांवरील ताण वाढत आहे. पावसाची आणखी दिरंगाई झाल्यास अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा पाहता नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शासकीय यंत्रणांकडून विविध जलस्रोतांवर लक्ष ठेवण्यात येत असून परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात आहे. जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील जलसाठ्यांवर मोठा ताण येऊ शकतो. आधीच अनेक प्रकल्प मृतसाठ्यावर पोहोचल्याने पिण्याचे पाणी, शेती आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे.

पाऊस लांबल्यास जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट अधिक तीव्र होऊ शकते अशी भीती जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. मागील आठवड्यात काही भागांत झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. विशेषतः धारूर, आष्टी, वडवणी, गेवराई आणि माजलगाव परिसरात पेरण्यांची प्रतीक्षा कायम असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

follow us