Nitesh Rane clarifies his stance at the protest site : स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील विविध प्रश्नांवरून राज्यभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना मंत्री नितेश राणे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार अतिशय सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी सरकारने घेतली आहे. काही मागण्या घटनात्मक आणि संविधानिक प्रक्रियेशी संबंधित असल्याने त्या पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. राज्य सरकार संपूर्ण ताकदीने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे असल्याचा पुरुच्चार त्यांनी केला.
व्ही. राधा समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वासही राणे यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर कोणतीही राजकीय टीका-टिप्पणी करणार नसल्याचे सांगत, आपण विद्यार्थ्यांना विश्वास देण्यासाठी आणि त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर भाष्य करताना राणे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे हेच प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय आरोपांना किंवा टीकेला उत्तर देण्यात वेळ घालवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांच्या वक्तव्यांनी आयोग्य वेळी उत्तर दिल जाईल असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. मतदार यादी पडताळणी आणि एसआयआरच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी काही विरोधी पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बेकायदेशीर नागरिक किंवा एकापेक्षा अधिक वेळा मतदान करणाऱ्या व्यक्तींना मतदार यादीतून वगळले जावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासंदर्भात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचाही उल्लेख त्यांनी केला. रोहित पवार यांच्याबाबत बोलताना नितेश राणे यांनी त्यांना आपला मित्र संबोधले.
तो मी आयुष्यात मोठा मुर्खपणा केला; द्वारकाधीश मंदिरनिर्माणाबाबत असं का म्हणाले हिंतेंद्र ठाकूर?
भविष्यात ते एकत्र मंत्रिमंडळातही असू शकतात, असे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शरद पवार हे अनुभवी नेते असून त्यांना घटनात्मक प्रक्रियेची सखोल माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या कोणत्याही योग्य मागणीला नकार देत नाहीत, असे सांगत राणे यांनी सरकारने आधीच काही निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. वयोमर्यादा वाढवण्यासारखे निर्णय घेण्यात आले असून उर्वरित त्रुटीही टप्प्याटप्प्याने दूर केल्या जातील, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी आंदोलन करताना संयम बाळगण्याचे आवाहन केले.
तुमच्या घरात आई-वडील आहेत, तुमच्या प्रत्येक कृतीचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर आणि भवितव्यावर होतो, याची जाणीव ठेवावी, असे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवश्यक ती प्रक्रिया राबवली जाईल आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, व्ही. राधा समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर निर्णय होण्याची शक्यता असून भविष्यात स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकार पावले उचलेल, असे संकेतही नितेश राणे यांनी दिले.
