Nitesh Rane Rohit Pawar : भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून रोहित पवार यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिल्याचा दावा केला. सोमवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी रोहित पवार यांच्या राजकीय (BJP) भवितव्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाष्य केलं. सगळे रस्ते देवाभाऊंकडेच जातात, हे मी तेव्हाच रोहित पवार यांना सांगत होतो. ना आजोबा आले, ना राहुल गांधी धावून आले. शेवटी अडचणीच्या काळात देवाभाऊंनीच तुम्हाला बाहेर काढलं, असं राणे म्हणाले.
रोहित पवार यांचं राजकीय भविष्य कोण घडवू शकतं, असा प्रश्न उपस्थित करत राणे यांनी “एक देवाभाऊ, दोन देवाभाऊ आणि तिसरंही देवाभाऊच,” असं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यातून रोहित पवार यांना भाजपमध्ये येण्याचं अप्रत्यक्ष आवाहन करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी रोहित पवार यांच्यावर केलेल्या या टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात लक्ष वेधलं गेलं.
रोहित पवार यांच्या एमपीएससी आंदोलनातील भूमिकेवरही नितेश राणे यांनी टीका केली. रोहित पवार यांनी काल मेरिटमध्ये यश मिळवलं, त्यामागेही देवाभाऊंची भूमिका असल्याचं ते म्हणाले. “रोहित पवार यांनी आमचं ऐकलं असतं, तर त्यांचं वजन कमी झालं नसतं,” असा टोला त्यांनी लगावला. रोहित पवार यांना भाजपमध्ये प्रवेशाची तारीख आणि इतर तपशील आधीपासून माहिती असल्याचा दावाही राणे यांनी केला.
रोहित पवार यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी दोन कोट शिवून ठेवल्याचं सांगत राणे यांनी या मुद्द्यावरूनही त्यांच्यावर निशाणा साधला. रोहित पवार यांचं खातं प्रवेशाच्या तारखेवर अडल्याचं वक्तव्य करत, त्यांना प्रवेशाची तारीख माहिती असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, रोहित पवार यांच्याकडून याबाबत काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागलं आहे.
याच पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे गट आणि मनसेवरही टीका केली. अमित ठाकरे यांनी १९७५ मधील आणीबाणीचा उल्लेख करताना इंटरनेट बंद असल्याचं सांगितल्याच्या विधानावरून राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली. आदित्य ठाकरे यांच्या सहवासामुळे अमित ठाकरे यांच्या बोलण्यातही तसाच प्रभाव दिसत असल्याचं म्हणत त्यांनी टोला लगावला. पोलिसांच्या व्हॅनवर उभं राहून घोषणा देण्यावरूनही त्यांनी अमित ठाकरे यांच्यावर टीका केली.
ठाकरे गटाचे उमेदवार निवडून येत असताना पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा ऐकायला मिळाल्याचा आरोप राणे यांनी केला. दादरमध्ये स्वतःच्याच भावाला पाडण्यासाठी उमेदवार उभा केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी अमित ठाकरेंनी आधी महेश सावंत यांचा राजीनामा मागावा, असं आव्हान दिलं. तेजस ठाकरे आंदोलनस्थळी नवीन प्रजातीचे किडे सापडले असतील म्हणून आले असावेत, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.
ठाकरे कुटुंबाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरूनही राणे यांनी निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत हिंदुत्वाची बाजू सोडली नाही आणि त्यांच्या भूमिकेमुळे हिंदूंना सुरक्षिततेचा आधार मिळाला, असं ते म्हणाले. बाळासाहेबांचा जुना फोटो पोस्ट केल्याच्या मुद्द्यावरून सध्याच्या ठाकरे पिढीवर टीका करत, पूर्वीच्या आणि आताच्या भूमिकांमध्ये मोठा फरक असल्याचा दावा त्यांनी केला. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या मुद्द्यावर ठाकरे गटानं भूमिका घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. स्मित मछार यांनी लोकांचे प्राण वाचवल्याच्या प्रकरणात त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाकरे गटातील कोणी पुढे आलं नसल्याचंही राणे म्हणाले.
