Odisha Rajya Sabha election result : राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलंय. महाराष्ट्रासह काही ठिकाणच्या मिळून 26 जागा बिनविरोध झाल्या. पण 11 जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील एनडीएने सर्वाधिक आठ जागा जिंकल्यात. तर बिजू जनता दल आणि एका अपक्षाने बाजी मारलीय. ओडिशामध्ये भाजपकडे संख्याबळ नव्हतं. तरीही त्यांनी तिसरा उमेदवार निवडून आणलंय. ही मोहिम फत्ते केलीय राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलीय. बावनकुळे यांच्यावर ओडिशाची (Odisha Rajya Sabha) काय जबाबदारी होती, त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार कसा निवडून आणलाय तेच या पाहुया…
ओडिशामध्ये भाजपची सत्ता आहे. बिजू जनता दल (बीजेडी) हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. ओडिशा विधानसभेतून चार राज्यसभेचे सदस्य निवडून द्यायचे होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओडिशाच्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी निरीक्षक होते. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन आणि बिजू जनता दलाचा एक सदस्य निवडून गेला असता. तर बिजू जनता, काँग्रेस मिळून एक सदस्य निवडून गेला असता. परंतु भाजपने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देत चुरस निर्माण केली.
भाजपच्या दोन जागा निवडून येऊन अतिरिक्त वीस मते राहत होते. तर बिजू जनता दल आणि काँग्रेस आणि इतर अशी 34 मते अतिरिक्त राहत होते. त्यामुळे येथून विरोधकांना एक उमेदवार निवडून आणला असता. ओडिशाचे मुख्यमंत्री, निरीक्षक चंद्रशेखर बावनकुळे व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठी राजकीय खेळी सुरू केली. बीजेडी आणि काँग्रेसच्या आमदारांना क्रॉस व्होटिंगसाठी खेळी केली. कथित घोडेबाजाराच्या भीतीने काँग्रेसने ओडिशातील आठ आमदारांना आपली सत्ता असलेल्या कर्नाटकात हलविले होते. या आमदार सांभाळण्याची जबाबदारी काँग्रेसचे संकटमोचक असलेले डी. के. शिवकुमार यांच्यावर देण्यात आली होती.
त्यानंतर सोमवारी झालेल्या मतदानात काँग्रेसला झटका बसला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल आणि सुजीत कुमार, बीजेडीचे संतुप्त मिश्रा असे तिघे राज्यसभेवर सहज निवडून आले. पण चौथ्या जागेसाठी भाजपचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार, माजी मंत्री दिलीप रे आणि काँग्रेसचा पाठिंबा असलेले दत्तेश्वर होता यांच्यामध्ये लढत झाली. त्यात काँग्रेसचे आठ आणि बीजेडीचे तीन आमदार असे अकरा आमदार फुटले. त्यामुळे दिलीप रे यांनी मताचा कोटा पूर्ण केल्याने ते विजयी झाले आहेत. हा विजय मिळविण्यात चंद्रशेखर बावनकुळेंचाही वाटा आहे हे नक्की. या विजयानंतर काँग्रेस नेते, बीजेडीचे नेते व माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भाजपबरोबर हॉर्स ट्रेडिंगचा म्हणजे पैसे देऊन आमदार फोडल्याचा गंभीर आरोप केलाय. परंतु दोन्ही पक्षांनी फिल्डिंग लावून त्यांना आपले आमदार सांभाळता आलेले नाहीत.
