तीनवेळा आशियाई पॅरा गेम्स सुवर्णपदक विजेते नीरज यादव यांचा मृत्यू, डोपिंग निलंबनामुळे तणावात असल्याची चर्चा

पॅरा-ॲथलेटिक्स प्रशिक्षक सत्यनारायण यांनी नीरज यादव यांच्या मृत्यूला दुजोरा दिला असून ही अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Untitled Design   2026 10 28T145717.914

Untitled Design 2026 10 28T145717.914

Para Games gold medalist Neeraj Yadav passes away : भारतीय पॅरा-अॅथलेटिक्स क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन वेळा आशियायी पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावणारे भारताचे अनुभवी पॅरा-अॅथलेट नीरज यादव यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री दिल्लीतील त्यांच्या फ्लॅटमध्ये ही घटना घडल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. त्यांनी विष प्राशन केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, बुधवारी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेनंतर क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शविच्छेदनाच्या वेळी पॅरालिम्पिक विजेता सुमित आंतील आणि पॅरा-ॲथलीट विपीन कसाना रुग्णालयात उपस्थित असल्याचे वृत्त आहे. भारताचे मुख्य पॅरा-ॲथलेटिक्स प्रशिक्षक सत्यनारायण यांनी देखील नीरज यादव यांच्या मृत्यूला दुजोरा दिला असून ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नीरज यादव यांनी डोपिंग प्रकरणामुळे निलंबनाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांना आगामी एची-नागोया आशियायी पॅरा गेम्समध्ये सहभागी होता येणार नव्हते. या परिस्थितीमुळे ते मानसिक तणावात असण्याची शक्यता प्रशिक्षकांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूमागे हेच कारण होते, असे निश्चितपणे सांगता येणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आशियाई पॅरा गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर खेळाडूंना सरकारी रोख पुरस्कार आणि नोकरीच्या संधी मिळू शकतात. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याची नीरज यादव यांची इच्छा असण्याची शक्यता प्रशिक्षकांनी व्यक्त केली. मात्र, त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीबाबत आणि मृत्यूमागील कारणांबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

पराभव मान्य, पण चौकशी झालीच पाहिजे, पुणे शिक्षक मतदारसंघातील कथित पैशांच्या वाटपावर दत्तात्रय सावंत आक्रमक

उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले नीरज यादव हे भारतातील उल्लेखनीय पॅरा-ॲथलीट्सपैकी एक होते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांना पोलिओ झाला होता. मात्र, शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 2005 ते 2012 या काळात त्यांनी व्हीलचेअर टेनिसमध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर पॅरा-ॲथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली.

2015 मध्ये दिल्ली येथे झालेल्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत त्यांनी गोळाफेक, भालाफेक आणि थाळीफेक या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकली. या कामगिरीने त्यांच्या क्रीडा प्रवासाला नवी दिशा मिळाली. 2018 मध्ये इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये नीरज यादव यांनी पुरुषांच्या F55 भालाफेक प्रकारात 29.84 मीटरची कामगिरी नोंदवत सुवर्णपदक जिंकले. या कामगिरीसह त्यांनी आशियाई विक्रमही प्रस्थापित केला.

त्यानंतर 2023 मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्यांनी भालाफेक आणि थाळीफेक या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदके पटकावली. त्यामुळे त्यांच्या नावावर आशियाई पॅरा गेम्समधील एकूण तीन सुवर्णपदकांची नोंद झाली. नीरज यादव यांच्या क्रीडा कारकीर्दीत ऑक्टोबर 2023 मधील डोपिंग प्रकरणामुळे अडथळा निर्माण झाला होता. बेंगळुरू येथे करण्यात आलेल्या चाचणीत त्यांच्या नमुन्यात ‘स्टॅनोझोलॉल’ हे प्रतिबंधित अ‍ॅनाबॉलिक स्टिरॉइड आढळल्याचे वृत्त आहे. त्यानंतर राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेने त्यांच्यावर तात्पुरते निलंबन लादले होते.

‘वंदे मातरम्’च्या अवमानाचा आरोप, भालचंद्र मुणगेकरांना एशियाटिक सोसायटीची कारणे दाखवा नोटीस

या निर्णयाविरोधात यादव यांनी शिस्तपालन प्रक्रियेदरम्यान आपल्या नमुन्याची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे त्यांच्या स्पर्धात्मक कारकीर्दीवर परिणाम झाला होता. अनेक शारीरिक आव्हानांवर मात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावणाऱ्या नीरज यादव यांच्या निधनामुळे पॅरा-ॲथलेटिक्स क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागील परिस्थिती याबाबत अधिकृत माहिती समोर येणे अद्याप बाकी आहे.

Exit mobile version