पुण्यात कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर खळबळ; माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा
आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित कंत्राटदाराने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, तसेच सुसाईड नोट लिहून काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते.
Case registered against 14 people, including Ravindra Dhangekar : पुण्यात एका कंत्राटदाराच्या आत्महत्येनंतर मोठी राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली असून, या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित कंत्राटदाराने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, तसेच सुसाईड नोट लिहून काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खालील शेख असे आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराचे नाव असून ते पुण्यातील गुलटेकडी परिसरात वास्तव्यास होते. खालील शेख यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली. प्राथमिक तपासात आर्थिक व्यवहार, पैशांची देवाणघेवाण, भागीदारीतील वाद आणि अडकलेले पैसे यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे.
आत्महत्येपूर्वी खालील शेख यांनी एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही व्यक्तींची नावे घेत आपल्यावर आर्थिक अन्याय झाल्याचा आरोप केला होता. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक फसवणूक, व्यवहारातील मतभेत आणि पैशांच्या वादामुळे आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे.
मुंबईत पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा सुळसुळाट? 12 लाखांचा माल जप्त, नेटवर्कचा शोध सुरू
या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळासाहेब शेडगे यांच्यासह इतर भागीदार आणि संबंधित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओत आणि सुसाईड नोटमध्ये या व्यक्तींचा उल्लेख असल्याने पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानंतर पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर आणि इतर मिळून 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहार, भागीदारी करार, पैशांची देवाणघेवाण आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. खलील शेख यांच्या मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओतील आरोप, सुसाईड नोटमधील मजकूर आणि इतर पुरावे तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच संबंधित सर्व व्यक्तींचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कितपत सिद्ध होतो, याबाबत पोलिसांचा तपास निर्णायक ठरणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात एका माजी आमदाराचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाचे हे प्रकरण नेमके किती खोलवर आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.