आत्महत्येपूर्वी दोन व्हिडीओ, वरिष्ठांवर गंभीर आरोप; नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने संपवलं जीवन
विशेष शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना महापे परिसरातील एका लॉजमध्ये उघडकीस आली आहे.
Assistant Sub-Inspector ends his life : नवी मुंबई पोलीस दलातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. विशेष शाखेत कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना महापे परिसरातील एका लॉजमध्ये उघडकीस आली आहे. पांडुरंग निंबा पाटील असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन व्हिडीओ तयार केले असून, त्यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पांडुरंग पाटील हे नवी मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत होते. शनिवारी संध्याकाळी त्यांनी आत्महत्येपूर्वी तयार केल्याचे सांगितले जाणारे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे व्हिडीओ समोर येताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आणि त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, महापे येथील ‘साची लॉज’मध्ये पाटील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. लॉजच्या कर्मचाऱ्याने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया सुरू केली.
आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या एका व्हिडीओमध्ये पांडुरंग पाटील यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. तसेच एका माजी डीसीपी, एका एसीपी आणि एका हेड क्लार्कचे नाव घेत या तिघांकडून आपल्याला त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या कथित जाचाला कंटाळून आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटल्याची माहिती आहे. मात्र, या आरोपांची सत्यता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
मोशीत DJ च्या दणदणाटाने कुटुंब त्रस्त; आजारी वडिलांना घर सोडावं लागलं, अखेर मृत्यू, सोसायटीवर गंभीर आरोप
दुसऱ्या व्हिडीओमध्ये पांडुरंग पाटील यांनी आपल्या मुली आणि जवळच्या नातेवाईकांची माफी मागितली. मला माफ करा, असे म्हणत त्यांनी कुटुंबीयांना भावनिक निरोप दिल्याचे सांगण्यात येत आहे. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू झाले होते. मात्र, त्यानंतर त्यांचा मृतदेह महापेतील लॉजमध्ये आढळल्याने पोलीस दलातील सहकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला.
या घटनेबाबत सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पांडुरंग पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना खरी असून, त्यांनी हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, त्यांना कोणता त्रास होता आणि कोणाकडून जाच होत होता, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या आरोपांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पांडुरंग पाटील यांनी व्हिडीओमध्ये आठ पानी तक्रार अर्जाचा उल्लेख केला आहे. मात्र, हा अर्ज अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्यांची मोटारसायकल ताब्यात घेऊन तपासणी केली असून त्यामध्ये संशयास्पद काही आढळले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या कारची चावी पोलिसांना मिळाली असून कारचीही झडती घेतली जात आहे. आठ पानी तक्रार अर्जाचा शोध घेण्यासोबतच या प्रकरणाशी संबंधित इतर पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
जेएनयूमध्ये प्राध्यापकाविरोधात 11 विद्यार्थी पुढे; लैंगिक छळ आणि अतिरिक्त गुणांसाठी लैंगिक मागणी केल्याचा गंभीर आरोप
पांडुरंग पाटील हे 56 वर्षांचे होते आणि त्यांच्या सेवेत आणखी काही वर्षे शिल्लक होती. अशा परिस्थितीत पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने पोलीस खात्यातील अंतर्गत वातावरण आणि कामाच्या ताणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, पाटील यांच्या आत्महत्येमागे नेमके कोणते कारण होते, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पाटील यांनी उल्लेख केलेला आठ पानी तक्रार अर्ज सापडतो का, व्हिडीओमध्ये नाव घेतलेल्या व्यक्तींवरील आरोपांमध्ये तथ्य आहे का आणि संबंधितांची बाजू काय आहे, या सर्व बाबी तपासल्या जाणार आहेत. तपासानंतरच पांडुरंग पाटील यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण आणि व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.