Georai Police Action : गेवराई शहर आणि परिसरात सुरू असलेल्या (Georai) अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. गोदावरी नदीपात्रातील बेकायदा वाळू वाहतूक आणि शहरातील तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी एकाच वेळी कारवाईचा बडगा उगारला. या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल 32,39,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाळू तस्करीच्या प्रकरणात एक हायवा तर जुगार अड्ड्यावरील कारवाईत दहा जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही मोहीम राबवली. संगमजळगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळू उपसा करून हायवातून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता पोलिसांनी नदीपात्रात छापा टाकला.
या कारवाईदरम्यान पिवळ्या रंगाचा विनानंबर भारत बेंझ हायवा वाळूची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी चालक दादाराव दत्तू राठोड (32, रा. रामनगर तांडा, कुंभेजळगाव, ता. गेवराई) याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू उत्खनन किंवा वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी हायवासह एकूण 25,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि गौण खनिज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दरम्यान, गेवराई शहरातील जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी कारवाई केली. गुरुवारी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवरील जमादारनी पुलाजवळ असलेल्या चार्वक हॉटेलच्या मागील बाजूस तिर्रट जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र संतोष बारगजे, संतोष नेवाळे, शेख गफार, कदिर शेख, अर्जुन धुतडमल, भरत इंगोले, सुभाष भावले, ज्ञानेश्वर वादे, संजय सुतार आणि मजहर शेख या दहा जणांना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, 10 मोबाईल, 6 मोटारसायकली आणि 1 स्कुटी असा एकूण 7,15,310 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 698/2026 नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डोळस करीत आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत एकूण 32,39,310 रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध वाळू वाहतूक आणि जुगार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळातही अशा धंद्यांविरोधात कारवाई सुरू राहणार का, याकडे गेवराईकरांचे लक्ष लागले आहे.
