Rekha Konde Assault Case : पुण्यातील एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहर अध्यक्षा आरती मारणे यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप रेखा कोंडे यांनी केला आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, राजकीय वर्तुळातही या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
या घटनेबाबत भूमिका मांडताना आरती मारणे यांनी रेखा कोंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. रेखा कोंडे यांनी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून आपली बदनामी केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतही रेखा कोंडे बोलत असल्याचा आरोप केला. या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी रेखा कोंडे यांना पक्षातून काढून टाकावे, अशी मागणीही आरती मारणे यांनी केली.
बाळासाहेबांचा फोटो फाडला, ठाकरे गट संतापला; मुंबईत आंदोलन, शायना एन. सी. यांनी मागितली माफी!
आरती मारणे यांनी पुढे बोलताना, रेखा कोंडे आपल्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याने त्याला उत्तर दिल्याचे सांगितले. आपल्याला 2 मुली असून, अशा वक्तव्यांचा त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले. आपण अन्याय सहन करणाऱ्यांपैकी नसून मराठा समाजाच्या महिलांवर होणाऱ्या आरोपांना उत्तर देणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. तसेच रेखा कोंडे वारंवार पक्ष बदलत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दुसरीकडे, रेखा कोंडे यांनी आरती मारणे यांच्यावर पलटवार करत आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप केला. आपण कोणाचीही बदनामी केली नसून, पती नसताना आपल्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपण सामाजिक क्षेत्रात एकट्याने काम करत असून महिलांच्या प्रश्नांसाठी लढत असल्याने आपले काम काही जणांना सहन होत नसल्याचा दावाही रेखा कोंडे यांनी केला. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी आरोप केले असून, मारहाणीच्या घटनेबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.
