पुनावळे-ताथवडेत पोस्ट ऑफिस सुरू होण्याचा मार्ग मोकळा करा; राहुल कलाटेंची महापालिका आयुक्तांकडं कायमस्वरूपी जागेची मागणी
Punawale and Tathawade Post Office : पुनावळे आणि ताथवडे येथील मंजूर सब-पोस्ट ऑफिस सुरू करण्यासाठी कलाटेंचा मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा.
Punawale and Tathawade Post Office : पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील नागरिकांना टपाल सेवांसाठी इतर भागांत धावपळ करावी लागू नये, यासाठी नगरसेवक राहुल कलाटे यांनी पुढाकार घेतला आहे. पुनावळे आणि ताथवडे येथे केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली सब-पोस्ट ऑफिस लवकर सुरू व्हावीत, यासाठी महापालिकेने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात सप्टेंबर २०२६ मध्येच त्यांनी पत्राद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
वाढत्या नागरीकरणामुळे या तिन्ही परिसरांतील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे स्वतंत्र टपाल कार्यालयांची गरजही निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने पुनावळेसाठी ४११०८६, ताथवडेसाठी ४११०८७ आणि वाकडसाठी ४११०८८ असे स्वतंत्र पिनकोड निश्चित केले आहेत. स्वतंत्र पिनकोडची व्यवस्था झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना संबंधित टपाल सेवा त्यांच्याच परिसरात मिळणे अपेक्षित आहे. मात्र, पुनावळे आणि ताथवडे येथील मंजूर कार्यालयांसाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास विलंब होत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या ताब्यातील उपलब्ध जागांचा विचार करून पोस्ट ऑफिस विभागाला अल्पदरात कायमस्वरूपी जागा देण्याची मागणी राहुल कलाटे यांनी केली आहे. जागेचा प्रश्न मार्गी लागल्यास दोन्ही सब-पोस्ट ऑफिस सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना टपाल पाठवणे, विविध आर्थिक व्यवहार करणे आणि पोस्ट ऑफिसशी संबंधित इतर कामांसाठी दूरच्या भागात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत टपाल सुविधांचा विस्तार होणे गरजेचे असल्याचे राहुल कलाटे यांनी स्पष्ट केले आहे. मंजूर पोस्ट ऑफिस तातडीने कार्यान्वित करण्यासोबतच वाकड परिसरातील टपाल सेवा अधिक सक्षम करण्यासाठीही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. नागरिकांची गैरसोय दूर करून स्थानिक पातळीवरच सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाकडे हा विषय सातत्याने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.