Mumbai-Powai RA Studio building Rohit Arya death:- आज दुपारी मुंबईच्या पवई परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. जवळपास २० मुलं आणि मुलींना एका स्टुडिओत डांबून ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणात आता मोठे खूलासे पुढे येत आहेत. शिवाय, या प्रकरणातील मुख्य आरोपी असणारा रोहीत आर्य याचं मुंबई पोलिसांनी एनकाउंटर केलं, ज्यात त्याचा मृत्यु झाला आहे. आरोपी रोहित आर्य यानं शासनाकडून त्याचे 2 कोटी रुपये जे येणे होते ते मिळाले नसल्याचा आरोप केला होता. यासाठी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या काळात त्यानं उपोषणही केलं होतं.
स्टुडिओमध्ये त्यानं अभिनया सदर्भात एका वर्कशॉपचं आयोजन केलं होतं. यासाठी जवळपास १०० मुलांना बोलावण्यात आलं होतं. मात्र फक्त २० मुलंच यासाठी आली होती. गुरूवारी या वर्कशॉपचा ६ वा दिवस होता. दुपारी मुलांना जेवायला सोडण्यात येत होतं. मात्र, आज त्यांना सोडण्यात आलं नाही. त्यांना आर्य यानं डांबून ठेवत
स्टुडिओ जाळून टाकण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पोलीस, NSG कमांडो आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
परंतु पोलीस मुलांना वाचवण्यासाठी आल्यानंतर रोहित आर्याने गोळीबार सुरू केला. त्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यानंतर प्रत्युत्तरात पोलिसांनी रोहित आर्यावर फायरिंग केली. त्यात त्याला दोन गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारेंकडून एन्काऊंटर
सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे हे मुलांची सुटका करण्यासाठी गेले होते. त्यावेळी रोहित आर्याने आपल्याकडील पिस्तूलमधून पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. त्यात रोहित आर्याचा मृत्यू झाला.
रोहित आर्या नेमका कोण होता?
प्राथमीक माहितीनुसार रोहित हा पुण्याचा राहणारा आहे. रोहित आर्य हा मुंबईतल्या पवई भागात अभिनयाचे क्लास घेतो आणि ऑडिशनसंदर्भातील काही कामं करत होता. सोशल मीडियावर त्यानं आपली ओळख एक फिल्म मेकर आणि मोटीव्हेशनल स्पीकर अशी दाखवली होती. त्याचे एक युट्यूब चॅनेलही आहे ज्याचं ‘अप्सरा’ असं नाव त्यानं दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता.
शिक्षणमंत्री असताना दीपक केसरकर यांच्या काळात त्याला शाळेच्या कामाचं टेंडर मिळालं होतं. मात्र काम झालं तरी त्याला त्या कामाचे पैसे मिळाले नाहीत, असा त्याचा आरोप होता. केसरकर मंत्री होते तेव्हा त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यानं अनेकदा आंदोलनं केली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. शाळेच्या दुरूस्तीचं ते काम होतं. सरकारकडून त्याला काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं आत्महत्या करण्याचा विचार त्यानं केला होता. मात्र काहीच होत नसल्यानं शेवटी लक्ष वेधण्यासाठी त्यानं हे कृत्य केल्याचे बोलल्या जात आहे.
