बंगालच्या उपसागरातील समुद्राचे तापमान वाढल्याने ‘अकबन’ नावाचे शक्तिशाली चक्रीवादळ तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे वादळ २० नोव्हेंबरच्या रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ताशी १२० किलोमीटर वेगाने धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्राला या वादळाचा थेट धोका नसला तरी त्याच्या प्रभावामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
गेल्या आठवडाभरापासून समुद्रात या चक्रीवादळाची निर्मिती सुरू असल्याचे सांगितले जात आहे. समुद्रातून सातत्याने ऊर्जा मिळाल्यास त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी आलेल्या ‘अर्णब’ आणि ‘मुरासू’ या चक्रीवादळांच्या तुलनेत हे वादळ अधिक प्रभावी ठरू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हवामानावरही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असून पावसाच्या स्थितीकडे लक्ष लागले आहे.
राज्यात थंडीची चाहूल अन् चक्रीवादळाचं सावट! 19 नोव्हेंबरला विदर्भात पाऊस, एल निनोमुळे थंडीही कमी?
राज्यात सध्या उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटे गारठा जाणवत आहे. उत्तर महाराष्ट्र, घाटमाथा आणि कोकणातील तापमानात घट झाली असली तरी दिवसा उन्हाचा चटका कायम आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता असून काही भागांत ऊन, पाऊस आणि थंडी असे तिन्ही ऋतूंचे मिश्र स्वरूप अनुभवायला मिळू शकते. त्यामुळे आगामी काही दिवस राज्यातील हवामानात चढ-उतार राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, एकाच महिन्यात तिसऱ्या चक्रीवादळाची निर्मिती होत असतानाही राज्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. नोव्हेंबरपासून दुष्काळाची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, एल निनोचा प्रभाव फेब्रुवारीऐवजी मार्च-एप्रिलपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याने उन्हाळ्यात तीव्र उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. या हवामान बदलांचा आगामी मान्सूनवर नेमका काय परिणाम होतो, याकडेही हवामान अभ्यासकांचे लक्ष राहणार आहे.
