Prime Minister Modi to visit Baramati : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी बारामती दौऱ्यावर येणार असून, विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे त्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. याशिवाय विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय संस्थेची पाहणी देखील पंतप्रधान करणार असल्याची माहिती आहे. यावेळी संस्थेच्या कामकाजाबाबत त्यांच्यासमोर सादरीकरण होण्याची देखील शक्यता आहे.
पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बारामतीतील नक्षत्र गार्डन येथील प्रेरणास्थळाची पाहणी केली. याठिकाणी सुरू असलेल्या तयारीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात पदाधिकारी आणि विश्वस्थांसोबत बैठक घेत पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी युगेंद्र पवार, विठ्ठल मणियार, प्रताप पवार, प्रा. निलेश नलवडे, किरण गुजर आणि नीलिमा गुजर यांच्यासह सांबांधीत पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय, प्रशासकीय कामे होणार सोपी, 21 जिल्ह्यांत 47 नवी कार्यालये
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेले प्रेरणास्थळ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृती आणि विचारांना समर्पित आहे. शांतता, समता आणि मानवतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या प्रेरणास्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. येथे भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा उभारण्यात आला असून, विविध महापुरुषांची चित्रे आणि त्यांच्या कार्य-विचारांचा परिचय देखील देण्यात आला आहे. याच प्रेरणास्थळाच्या उदघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात पोहोचलेल्या शरद पवारांचे स्वागत एका ह्युमनॉइड एआय रोबोटने केल्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. पवार मुख्य इमारतीत दाखल होताच रोबोट त्यांच्या दिशेने चालत पुढे आला आणि यांत्रिक हात उंचावत त्यांचे स्वागत केले. शरद पवार यांनी देखील रोबोटकडे पाहत चला असे म्हटले, त्यानंतर रोबोट बाजूला झाला.
संगमनेरमध्ये भरणेंकडून नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी; शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही
शरद पवार आणि एआय रोबोट यांच्यातील हा अनोखा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तयारी सुरू असताना, दुसरीकडे शरद पवारांचे एआय रोबोटने केलेले स्वागतही या दौऱ्याच्या तयारीदरम्यान लक्षवेधी ठरले आहे.
