Prostitution under the name of ‘spa’ in Beed : बीड शहरात ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी बुधवारी रात्री एकाचवेळी तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत काही पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, संबंधित स्पा सेंटरच्या चालकांसह व्यवस्थापनातील व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बीड शहर आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरातील नगर नाका परिसरातील ‘मिड स्पा’वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (एएचटीयू) आणि शिवाजीनगर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली.
बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास बनावट ग्राहक आणि दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून स्पावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली. तसेच गैरकृत्य सुरू असल्याच्या आरोपावरून सोमदेव राजेंद्र भारती (24, रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून रोकड आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, बीड शहर पोलिसांनी ‘ब्लीस’ आणि ‘क्रिस्टल’ स्पावरही छापे टाकले. या दोन्ही ठिकाणीही काही महिलांची सुटका करून संबंधितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
जेलमधून वाल्मिक कराडने सूत्रे हलवली; बजरंग सोनवणेंनी रेकॉर्डिंग ऐकवली, ‘माझ्या मुलाला विलास घुले प्रकरणात अडकवण्याचा कट’
या कारवाया पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. मिड स्पाप्रकरणी अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाजीनगर पोलिसांच्या कारवाईत पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे, महिला पोलिस अंमलदार उषा चौरे, अंमलदार अशोक शिंदे यांचा सहभाग होता. बीड शहरात मागील काही दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी चर्चेत होत्या. त्यानंतर पोलिसांनी एकाचवेळी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईमुळे स्पा सेंटर चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील इतर स्पा सेंटरवरही पोलिसांची नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
