पायल झांबरेच्या मृत्यूप्रकरणी माहेरच्या कुटुंबाचा संताप; साडेसात वर्षे छळ केल्याचा आरोप, सासरच्यांवर गंभीर ठपका

Payal Zambre Case : पुण्यातील पायल झांबरे मृत्यूप्रकरणात माहेरच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

News Photo   2026 11 04T141425.675

Payal Zambre Case

Payal Zambre Case : पुण्यातील मुकुंदनगर परिसरात 29 वर्षीय पायल पवार-झांबरे हिच्या मृत्यूने पुन्हा एकदा हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 1 नोव्हेंबर रोजी पायलचा राहत्या घरी मृत्यू झाला. (Pune) तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर पैशांसाठी, सोन्यासाठी आणि मुलगा हवा असल्याच्या अपेक्षेतून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. पायलला मुलगी झाल्यानंतर सासरच्या लोकांचा त्रास वाढल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. वर्षभरापूर्वी पुण्यातच वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूची घटना घडली होती. त्यानंतर आता पायलच्या मृत्यूमुळे हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

पायलच्या भावाने सांगितले की, मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिच्याशी वाईट वागणूक सुरू केली होती. प्रसूतीनंतर रुग्णालयात आल्यानंतरही मुलगी झाल्याच्या कारणावरून वाद घातल्याचा आरोप त्याने केला. पायलला पुन्हा सासरी नेण्यासही तिचे सासरचे लोक तयार नव्हते. त्यामुळे ती जवळपास वर्षभर माहेरी राहिली. या काळात कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींशी एक-दोन वेळा बैठका घेतल्या. त्यांच्या घरी जाऊन विनवणी केली आणि गरज पडल्यास आणखी पैसे देण्याची तयारी दर्शवली, तरीही पायलला घेऊन जाण्यास ते तयार नव्हते, असे तिच्या भावाने सांगितले.

पायलच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, प्रत्येक सणाला माहेरून सोनं, चांदीची भांडी आणि महागड्या कपड्यांची मागणी केली जात होती. दिवाळी असो किंवा धोंड्याचा महिना, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वस्तू आणण्याचा आग्रह धरला जात होता. अक्षय झांबरेची बहीण घरी आल्यानंतर पायलला मारहाण करत असल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे. माहेरचे लोक सासरी गेल्यानंतर त्यांची योग्य पद्धतीने उठबस झाली पाहिजे, अशी अपेक्षा ठेवली जात होती. या मागण्या पूर्ण न झाल्यास पायलला त्रास दिला जात होता, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गेल्या साडेसात वर्षांपासून पायल हा छळ सहन करत होती, अशी माहिती तिच्या आईने दिली.

गोकुळ अध्यक्ष निवडणूक, बंटी पाटलांसाठी रवींद्र धंगेकर मैदानात; फोडला बॉम्ब

पायल ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. 2019 मध्ये तिचे अक्षय झांबरे याच्याशी लग्न झाले होते. लग्नासाठी माहेरच्या कुटुंबाने 50 तोळे सोन्यासह सुमारे 80 लाख रुपये खर्च केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, लग्नानंतरही पैशांसाठी तिचा छळ सुरू राहिल्याचा आरोप आहे. प्रत्येक सणाला माहेरून 10 तोळे सोनं आणण्याचा तगादा लावला जात होता. 2023 मध्ये पायलला मुलगी झाल्यानंतर तिचा छळ आणखी वाढला. वडिलांच्या संपत्तीत वाटा मागण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

1 नोव्हेंबरच्या रात्री पायलने भावाला शेवटचा संदेश पाठवला होता. त्यात तिने सासूला जबाबदार धरल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. भावाने अक्षयशी संपर्क साधला असता त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी पायलचे नातेवाईक तिची चौकशी करण्यासाठी सासरी पोहोचले. पायल कुठे आहे, याची माहिती नसल्याचे सासरच्या मंडळींनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी समोरच्या फ्लॅटची खिडकी फोडून आत प्रवेश केला असता पायलचा मृतदेह आढळल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. प्रतिष्ठा राखण्यासाठी मुलीने इतकी वर्षे त्रास सहन केला, अशी हळहळ तिच्या आईने व्यक्त केली.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी पायलचा पती अक्षय झांबरे याला अटक केली आहे. 3 नोव्हेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पायलच्या सासू, सासरे आणि नणंद यांच्यावरही कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून ते अद्याप फरार असल्याची माहिती आहे. पायलच्या मृत्यूमागील परिस्थिती, माहेरच्या कुटुंबीयांनी केलेले छळाचे आरोप आणि इतर संशयितांची भूमिका यांचा पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात पायलच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि सर्व संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे.

Exit mobile version