2005 ला बाहेर पडण्याची घोषणा केली त्याच राज ठाकरेंनी आज युतीची घोषणा केली, वाचा A टू Z स्टोरी

बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा चेहरा राज ठाकरे असतील अशी जोरदार चर्चा असतानाच 2005 ला राज ठाकरे बाहेर पडले होते.

News Photo   2025 12 24T151533.601

2005 ला बाहेर पडण्याची घोषणा केली त्याच राज ठाकरेंनी आज युतीची घोषणा केली, वाचा A टू Z कहाणी

महाराष्ट्राच्या राजकारणात 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Thackeray) पुन्हा एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू गेली अनेक दिवसांपासून महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात होत्या. हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय आला आणि पहिल्यांदा हे दोघ बंधू 20 वर्षांनी एकत्र व्यासपीठावर आलेले संबंध देशाने पाहिले. त्यानंतर ही राजकीय युती आहे का फक्त कौटुंबी असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र आलोत एकत्र राहण्यासाठी असं सांगून पुढील दिशा स्पष्ट केली होती. अखेर, आज दोन्ही ठाकरे बंधुंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मनसे आणि शिवसेना युती झाल्याचं जाहीर केलं आहे. आता या युतीनंतर चर्चा सुरू आहे ती राज ठाकरे यांच्या शिवसेनतून बाहेर पडलेल्या 2005 च्या त्या पत्रकार परिषदेची.

तारीख- 18 डिसेंबर 2005, ठिकाण- शिवाजी पार्क जिमखाना. राज ठाकरे यांनी येथे पत्रकार परिषद बोलावली होती. ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले होते की, ‘त्यांनी आदर मागितला होता, पण त्यांना फक्त अपमान आणि अपमान मिळाला.’ खरं तर, राज ठाकरे यांना शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय उत्तराधिकारी मानले जात होतं. कारण ते उद्धव यांच्यापेक्षा पक्षात अधिक सक्रिय होते आणि त्यांची प्रतिमा देखील त्यांचे काका बाळासाहेबांसारख्याच एका ज्वलंत नेत्याची होती, पण तेव्हा तस न होता शिवसेनेचा चेहरा उद्धव यांना करण्यात आलं होतं, आणि तेच पुढे शिवसेनेचा चेहरा असतील असंही स्पष्ट दिस असल्याने मोठ्या घडामोडी घडल्या होत्या.

Video : अखेर ठाकरे बंधूंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा; उद्धव राज 20 साल बाद पुन्हा एकत्र

राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला नाही, तर हे सगळं 1995 मध्येच सुरू झालं होतं. दोन्ही भावांमधील सतत वाढत जाणारे मतभेद आणि हक्कांसाठीचा संघर्ष होता. जरी, राज ठाकरे हे शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वात जवळचे होते. बाळासाहेबांची तीच वृत्ती, थेटपणे बोलण्याचे तेच धाडस हे सगळे गुण राज ठाकरेंच्या अंगी उपजतच होते. त्यामुळेच राज ठाकरे हेच बाळासाहेबांचा उत्तराधिकारी असतील असं मानलं जात होतं. कारण, तोपर्यंत उद्धव ठाकरे राजकारणात इतके सक्रिय नव्हते.

1995 साली उद्धव यांनी पक्षाचे काम पाहण्यास सुरुवात केली आणि पक्षाच्या निर्णयांमध्ये बाळसाहेब ठाकरेंना मदत करण्यास सुरुवात केली. यानंतर, 1997 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत, राज ठाकरेंच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून, बहुतेक तिकिटं उद्धव ठाकरेंच्या इच्छेनुसार वाटण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवल्यानंतर, उद्धव यांचे पक्षावरील वर्चस्व अधिक मजबूत झाले आणि राज ठाकरे यांना बाजूला करण्यात आलं. यामुळे, दोन्ही भावांमधील स्पर्धा आणि मतभेदांची दरी आणखी वाढली होती.

2003 साली राज ठाकरे यांनी महाबळेश्वरमध्ये उद्धव ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव मांडला. हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. तथापि, हा प्रस्ताव सर्वांनी मान्य केला आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झाले. शेवटी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि 2006 मध्ये स्वतःचा पक्ष मनसे स्थापन केला. तथापि, इतक्या वर्षांच्या स्थापनेनंतरही मनसे संपूर्ण महाराष्ट्रावर आपला प्रभाव सोडू शकली नाही आणि पक्षाचा पाठिंबा फक्त मुंबई-नाशिकपुरता मर्यादित राहिला आहे.

तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका; युतीच्या घोषणेवेळी महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंचा संदेश

नवीन पक्ष बनल्यानंतर, 2009 मध्ये जेव्हा मनसेने पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांना 13 जागा मिळाल्या. या निवडणुकीत त्यांनी ‘मराठी माणूस’ या मुद्द्याचे भांडवल केलं. पण 2014 आणि 2019 मध्ये ती प्रत्येकी एका जागेवर आली. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नाही. पक्ष राजकीयदृष्ट्या संघर्ष करत आहे आणि राज ठाकरे राजकीय अस्तित्वासाठी लढत आहेत असा हा सगळा काळ आहे.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळलं आणि शिवसेनेत फूट पडली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. परिस्थिती आणखी बिकट झाली, त्यांनी त्यांचं पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हही गमावलं. जोरदार पुनरागमन करत, त्यांनी गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (UBT) नावाच्या त्यांच्या नवीन पक्षाचे नेतृत्व केले आणि नऊ जागा जिंकल्या, ज्यामुळे २०२४ च्या उत्तरार्धात होणाऱ्या राज्य निवडणुकीत चांगल्या कामगिरीची आशा निर्माण झाली. परंतु, विधानसभा निवडणुकीत कामगिरी निराशाजनक होती. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने (UBT) 92 जागा लढवल्या आणि केवळ 20 जागा जिंकल्या, तर ठाकरे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 जागा जिंकल्या.

अखेर आज युतीची घोषणा 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आतापर्यंत अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसत आले आहेत. त्या त्या वेळी त्याच्या एकत्र येण्याची चर्चा व्हायची. परंतु राजकीयदृष्ट्या त्यांनी कधीही असा निर्णय याअगोदर घेतला नव्हता आणि तशी काही घडामोड घडल्याचंही पुढं आलं नव्हत. परंतु, काही दिवसांपूर्वी चौथीच्या वर्गापर्यंत हिंदी भाषा सक्ती करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. त्या निर्णयाला मराठी सामान्य लोकांसह पक्ष संघटनांनी कडाडून विरोध केला. त्यामध्ये आक्रमक होत पुढे आले ते राज ठाकरे आणि उद्धव ठकरे हे दोन बंधू. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आग्रमकपणे या धोरणाला विरोध करायला लागला. त्यातूनच या बंधुंचे सूर जुळले आणि त्यांनी पहिल्यांदा एका व्यासपिठावर येत हिंदी सक्तीविरोधात भूमिका घेतली आणि तेव्हा मनसे शिवसेना युतीची मुहुर्तमेढ रोवली गेली.

त्यानंतर अनेकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी होत गेल्या. चर्चा होत राहिल्या. आणि आज अखेर अधिकृतपणे दोघा भावांनी एकत्र येत मनसे आणि शिवसेनेची युती झाली आहे अशी घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला हा एक नवा वळण देणारा क्षण ठरणार आहे असं वातावरण राज्यभरात आहे. तोंडावर महानगरपालिका आहे. मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंकडेच कायम राहिलेली आहे. ती मिळवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता ठाकरेंची युती झाल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता ठाकरे युती ही महापालिकेत कसा चमत्कार करते आणि पुढील निवडणुकांमध्येही अशीच कायम राहते का हे पाहण महत्वाचं ठरणार आहे. बाकी, 18 डिसेंबर 2005 रोजी आपण शिवसेनेतून बाहेर पडत आहोत अशी घोषणा करणाऱ्या राज ठाकरेंनीच आज दि. 24 डिसेंबर 2025 रोजी आपण मनसे आणि शिवसेनेची युती झाली अशी घोषणा केली आहे हाच आजच्या राजकीय घडामोडींचा एक 20 वर्षांनी पूर्ण झालेला राजकीय अंक आहे.

Exit mobile version