हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्यांना कळतं, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा खेळ राज ठाकरेंनी आधीच ओळखला होता?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट करत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या राजकारणावर निशाणा साधला आहे.

Untitled Design   2026 11 28T160040.270

Untitled Design 2026 11 28T160040.270

Raj Thackeray’s commentary on Pawar’s politics : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य राजकीय जवळीकीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट करत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या राजकारणावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केलेल्या आपल्या भाकिताची आठवण करून देत राज ठाकरेंनी आता पुन्हा एकदा पवारांच्या राजकीय खेळीवर भाष्य केलं आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपच्या दिशेने गेला होता. त्यावेळीच आपण राष्ट्रवादीची दुसरी टीमही भविष्यात सत्तेच्या सोपानासाठी येईल, असं म्हटलं होतं. पुढील तीन वर्षे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी एकमेकांशी भांडणाचं नाटक केलं आणि आता आपण व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे दुसरी टीमही सत्तेच्या दिशेने निघाली आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यासोबतच राज ठाकरेंनी 2 जुलै 2023 रोजी केलेल्या जुन्या पोस्टचाही संदर्भ दिला आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, राष्ट्रवादीचा पहिला गट सत्तेच्या दिशेने रवाना झाला असून, यथावकाश दुसरा गटही सत्तेच्या सोपानासाठी सहभागी होईल. तसेच महाराष्ट्र भाजपला एकनाथ शिंदे यांना दिलं जाणारं महत्त्व रुचत नव्हतं आणि त्यावर राष्ट्रवादीच्या फुटीच्या माध्यमातून अनायसे उतारा मिळाला, असंही त्यांनी म्हटलं होतं.

डिलिमेटेशनवरून आघाडीत नाराजी? लंके म्हणाले, चुकीच्या पोस्ट करू नका…

राज ठाकरे यांनी आपल्या जुन्या पोस्टमध्ये राज्याच्या राजकारणावरही प्रश्न उपस्थित केले होते. ज्या महाराष्ट्राने देशाला प्रबोधन केलं, त्या महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेल्याचं पाहून मन खिन्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे राजकारण थांबवणार की पुन्हा त्यालाच कौल देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.

आता नव्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजकीय रणनीतीचा उल्लेख करत, हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं, अशी टिप्पणी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील संभाव्य राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. एकूणच, अजित पवारांच्या बंडानंतर व्यक्त केलेला आपला जुना अंदाज आता खरा ठरत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या पोस्टचा रोख राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या राजकीय भूमिकेकडे आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या संभाव्य हालचालींकडे असल्याचं दिसत आहे.

Exit mobile version