राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात राजीकय (Election) घडामोडींसह आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘अजित पवार गेल्यानंतर सुनिल तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केलं. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावली, असं खळबळजनक विधान रामदास कदम यांनी केलं आहे. सुनील तटकरे यांच्यावर आरोप करत रामदास कदम म्हणाले की, ‘अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी वहिनींना शपथ घ्यायला सुनील तटकरे यांनी भाग पाडलं. १० दिवस गेले असते तर काय झालं असतं? शरद पवार ताबा घेतील या भीतीने वहिनींना शपथ घ्यायला त्यांनी भाग पाडलं असा थेट वार त्यांनी केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान कोकणात राजकारण तापलं आहे.
सुनेत्रा पवार अन् परिवाराशी चर्चा करणार, उपमुख्यमंत्रिपदावर सुनील तटकरे स्पष्टच बोलले
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केलं. यातच रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवरून आता राजकारणांत खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी केलेली ही कृती निंदनीय आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांना संपवण्याचे काम तटकरे यांनी केलं. लोकसभेत त्यांना मी निवडून आणलं मात्र योगेश कदम यांना पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असा देखील गंभीर आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केला आहे.
दरम्यान, अजितदादांना सुनील तटकरेंनी संपवलं असल्याचं वक्तव्यही कदम यांनी केलं आहे. राजकारणात जो माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करू शकतो, तो काहीही करू शकतो, अशा आशयाचं वक्तव्य कदम यांनी केलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष महायुतीचा भाग आहेत. तरीही कदम यांनी अशाप्रकारे तटकरे यांच्यावर टीका केल्याने महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
