DGCA लाचखोरी प्रकरणावर रोहित पवार आक्रमक; अटक झालेला फक्त छोटा मासा, मोठे अजूनही बाहेर

ड्रोन आयातीसाठी परवानग्या देताना लाच घेतल्याच्या आरोपावरून DGCAमधील उपमहासंचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक.

  • Written By: Published:
Untitled Design 10

Rohit Pawar aggressive on DGCA bribery case : नागरी विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारे एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थातच सीबीआयने डीजीसीएमधील भ्रष्टाचाराचं मोठं रॅकेट उघडकीस आणत धडक कारवाई केली आहे. ड्रोन आयातीसाठी परवानग्या देताना लाच घेतल्याच्या आरोपावरून डीजीसीएमधील उपमहासंचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, एअरवर्थिनेस संचालनालयातील उपमहासंचालक मुदावत देवूला आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत माथूर हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत.

ड्रोन आयातीशी संबंधित अर्ज मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी 5 लाख रुपये, अशा एकूण 15 लाख रुपयांच्या लाचेचा व्यवहार ठरल्याचे तपासात समोर आले आहे. 18 एप्रिल रोजी दिल्लीतील आयआयटी फ्लायओव्हरजवळ सापाला रचून सीबीआयने त्यांना रंगेहात पकडले. सुरूवातीला 2.5 लाख रुपयांची देवाणघेवाण होत असताना ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर सीबीआयने दिल्लीतील चार ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये 37 लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीची नाणी आणि अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या संपत्तीचा स्तोत्र काय आणि या प्रकरणात आणखी कोण सामील आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.

दरम्यान संपूर्ण प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत डीजीसीए मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचा दावा केला. अटक झालेला अधिकारी हा केवळ छोटा मासा असून, या यंत्रणेत अनेक मोठे अधिकारी सामील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याचबरोबर अजित पवार यांच्या अपघात तपासावर देखील रोहित पवार यांनी प्रशचिन्ह उपस्थित केले आहे. डीजीसीए मधील भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांमध्ये फेरफार करून अपघाताचा अहवाल क्लीन करण्यात आला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तसेच व्ही. के. सिंग यांचा देखील अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी शंका व्यक्त केली.

राजकीय स्तरावर देखील त्यांनी टीका करत तेलगू देसम पक्ष आणि केंद्र सरकार यांच्यात साटंलोटं असल्याचा आरोप केला. अजित पवारांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करून देखील दोन महिने उलटले, तरी तपास सुरू न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, दुसरीकडे सीबीआय स्वतःहून कारवाई करते, हे संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.या प्रकरणामुळे डीजीसीएच्या एअरवर्थिनेस संचालनालयावर गंभीर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. हे संचालनालय विमानांची नोंदणी, हवाई पात्रतेचे प्रमाणपत्र देणे आणि देखभाल संस्थांना मंजुरी देणे यांसारखी अत्यंत संवेदनशील कामे पाहते. त्यामुळे अशा विभागातच लाचखोरी उघड झाल्याने सुरक्षेच्या दृष्टीने देखील चिंता व्यक्त केली जात आहे.

याआधी देखील डीजीसीए वादात सापडले होते. 2025 मध्ये जिंदगी एअरलाईन्स संबंधित मोठ्या गोंधळात हजारो उड्डाणे रद्द झाली होती आणि लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. त्या प्रकरणानंतर तत्कालीन महासंचालक फैज अहमद किडवाई यांना पद सोडावे लागले होते. आता या नव्या लाचखोरी प्रकरणामुळे पुन्हा एकदा देशाच्या विमान वाहतूक नियामक संस्थेच्या पारदर्शकतेवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

follow us