Rohit Pawar on MPSC paper leak and contractor: MPSC च्या अंतर्गत अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी घेण्यात पेपरफुटीच्या आरोपांवरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पेपर फुटल्याचे पुरावे आयोगाकडे आधीच दिले होते, असा दावा त्यांनी केला. या प्रकरणात आता FIR दाखल झाली असून अनेक जणांचा सहभाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, “आम्ही आयोगाला भेटलो होतो आणि हा पेपर फुटला असल्याचे सांगितले होते. अनेक लोकांना भेटून याबाबत विनंती केली होती. आम्ही आयोगाला पुरावेही दिले होते. या परीक्षेतील प्रश्न आधीच फुटले होते, मात्र त्यावेळी MPSCकडून पेपर फुटला नसल्याचे सांगितले जात होते.”
पावसाच्या तुटीचा मराठवाड्याच्या शेतीला फटका; 3.5 लाख हेक्टर क्षेत्र घटलं, वाचा चिंताजनक आकडेवारी
मात्र, पुरावे दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात आला आणि आता MPSCने पेपर फुटल्याचे मान्य केले असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या प्रकरणात अनेक जण सहभागी असल्याचे समोर आले असून FIR दाखल झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
पेपरफुटीच्या इतिहासाचा दाखला देताना रोहित पवार म्हणाले की, “1997 मध्ये पहिल्यांदा पेपर फुटला होता आणि त्यावेळच्या अध्यक्षांना जेलमध्ये टाकण्यात आले होते.” त्यामुळे सध्याच्या प्रकरणातही जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
अनाया बांगरचं क्रिकेटमध्ये पुनरागमन; या देशाने दिली खेळण्याची संधी पण BCCI चा नियम काय सांगतो?
MPSCच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, तसेच या संपूर्ण प्रकरणातील तपास आणि FIR सार्वजनिक करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. पेपर तब्बल 40 लाख रुपयांना विकला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. आयोगाचा अध्यक्ष पारदर्शकपणे काम करणारा असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कंत्राटदारांच्या आत्महत्यांवरही रोहित पवार आक्रमक
दरम्यान, कंत्राटदारांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यावरही रोहित पवार यांनी सरकारला घेरले. मुंबईत गजानन देवकाते या सरकारी कंत्राटदारीने काम पुर्ण करुन बिल न मिळाल्याने स्वतःचे जीवन संपवले. तसेच राज्यात बहुतेक कंत्राटदारांची अशीच परिस्थिती सध्या सुरु आहे. रोहित पवारांनी या कंत्राटदाराच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले. मात्र, आर्थिक अडचणींमुळे कंत्राटदारांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
“ज्याने आत्महत्या केली आहे ते दुर्दैवी आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, आपण रस्त्यावर येऊन लढू; आत्महत्या करू नका,” असे रोहित पवार म्हणाले.
रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून अभिनेत्री ट्रोल, क्रिती सेननच सडोतोड उत्तर, राहुल गांधींचीही मिळाली साथ
राज्यातील कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणावर देणी थकीत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले. “सगळे कंत्राटदार मराठी आहेत, ज्यांचे पैसे दिले जात नाहीत. गुजराती, तमिळ कंत्राटदार असेल तर त्यांना पैसे वेळेत दिले जातात,” असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील मराठी कंत्राटदारांचे तब्बल 90 हजार कोटी रुपये अद्याप थकीत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. अनेक कंत्राटदारांनी काम पूर्ण करण्यासाठी स्वतःची मालमत्ता आणि बचत पणाला लावली असल्याचे त्यांनी सांगितले.
“कुणी बायकोचे दागिने विकून काम केले आहे, तर कुणी जमिनी विकून काम केले आहे. तरीही त्यांचे पैसे का दिले जात नाहीत?” असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
मुंबईच्या आमदारांच्या कामगिरीत सत्ताधारी पिछाडीवर; टॉप 5 मध्ये एकही सत्ताधारी आमदार नाही
कंत्राटदारांच्या थकीत देणी आणि आत्महत्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने कंत्राटदारांचे पैसे तातडीने द्यावेत, अन्यथा नागपूरचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
त्यामुळे MPSC पेपरफुटी प्रकरण आणि कंत्राटदारांच्या थकीत देणी या दोन्ही मुद्द्यांवरून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
