Rohit Pawar’s ultimatum to the government : पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज करावा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम असून, आता राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम रोहित पवार यांनी दिला आहे. आज संध्याकाळपर्यंत सरकारने विद्यार्थ्यांना भेटून ठोस निर्णय कळवावा, अन्यथा उद्या आंदोलनाबाबत वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला. गरज पडल्यास आयोगाच्या अध्यक्षांसोबतच सरकारच्या राजीनाम्याची मागणी देखील करावी लागेल, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधांवरून गंभीर आरोप केले. भीमनवार हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा मित्राला वाचवण्याला अधिक महत्व दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. भीमनवार यांना यापूर्वी विविध महत्वाच्या पदांवर संधी मिळाली आणि त्यानंतर एमपीएससी अध्यक्षपद देखील देण्यात आलं, असं सांगत रोहित पवार यांनी या नियुक्त्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांकडून अध्यक्षांना हटवण्याची मागणी होत असताना दोन-तीन दिवसांत निर्णय घेता आला असता, मात्र हा विषय इतका काळ प्रलंबित ठेवल्याने मुख्यमंत्री विद्यार्थ्यांपेक्षा मित्राचा अधिक विचार करत असल्याचं दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘मोदी सरकार सहा महिन्यांत जाणार?’ संजय राऊतांचं मोठं भाकीत; CJP आंदोलनावरूनही केला घणाघात
एमपीएससी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना अर्बन नक्षल संबोधण्यात आल्याच्या आणि त्यांनी पैसे घेतल्याच्या आरोपांवर देखील रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. हे विद्यार्थी कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नव्हे, तर स्वतःच्या हक्कांसाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आंदोलन करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची अशा प्रकारे बदनामी करणं म्हणजे त्यांच्या संघर्षाची थट्टा करण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या मुलांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावं लागत असताना त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
एमपीएससी आयोगाचंशुद्धीकरण करायचं असेल, तर सर्वप्रथम आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवणं आवश्यक आहे, अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी मांडली. विवेक भिमनवार यांना अध्यक्षपदावर ठेऊन आयोगातील त्रुटी दूर होणार नाहीत, असं सांगत त्यांनी अध्यक्षांना हटवण्याची मागणी पुन्हा अधोरेखित केली. आज संध्याकाळी आंदोलनकर्ते पुढील भूमिका स्पष्ट करतील आणि उद्यापासून आंदोलनाचं स्वरूप कसं असेल, याची माहिती देतील, असं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे सरकार आज काही निर्णय घेणार का, याकडे विद्यार्थ्यांसह राजकीय वर्तुळाहक लक्ष लागलं आहे.
