जे पाप अयोध्येत, तेच छत्रपती संभाजी नगरात! रामाच्या नावाने जमिनीची लूट?, राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

Sambhajinagar Illegal Plotting Case : छत्रपती संभाजीनगरातील 41 एकर ट्रस्टच्या जमिनीवरील कथित प्लॉटिंगवरून संजय राऊत यांचे गंभीर आऱोप.

News Photo   2026 11 14T182026.432

Sambhajinagar Illegal Plotting Case

Sambhajinagar Illegal Plotting Case : छत्रपती संभाजीनगरातील जाधववाडी परिसरात (Crime) श्रीराम मंदिर संस्थान आणि बालाजी मठाच्या मालकीच्या ४१ एकर जमिनीवरील कथित अवैध प्लॉटिंगचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. या जमिनीवर तब्बल ८१० अनधिकृत भूखंड तयार करून त्यांची विक्री करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यानी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गट क्रमांक १२४ आणि १२५ मधील जवळपास ८० टक्के क्षेत्रावर अनधिकृत प्लॉटिंग झाल्याचा दावा करत यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणाची तक्रार महापालिका आयुक्त आणि संनियंत्रण अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यानंतर प्रशासनाने पोलिसांत गुन्हा दाखल केला. मात्र, अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण न करताच पथक माघारी फिरल्याचा आरोप समीर साजिद यानी केला आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे अधिकारी संतोष वाहुळे पथकासह घटनास्थळी गेले होते. मात्र, ८० रस्त्यांपैकी केवळ एका सिमेंट रस्त्याचे बांधकाम हटवल्यानंतर त्याना कोणाचा तरी फोन आला आणि त्यानंतर कारवाई थांबवण्यात आली, असा दावा साजिद यानी पत्रकार परिषदेत केला.

महापालिकेच्या नियमानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण केल्यानंतर संबंधित गट क्रमांक बंद करणे आणि पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे साजिद यानी सांगितले. मात्र, गुन्हा दाखल होऊनही गट क्रमांक १२४ आणि १२५ अद्याप बंद का करण्यात आले नाहीत, असा सवाल त्यानी उपस्थित केला. संबंधित अधिकाऱ्याना आलेला फोन नेमका कोणाचा होता, याचाही खुलासा लोकप्रतिनिधींसमोर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्याचा इशाराही त्यानी दिला आहे.

Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यानीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अयोध्येत जे घडले, तेच छत्रपती संभाजीनगरात रामाच्या नावाने सुरू असल्याचा आरोप करत राऊत यानी श्रीराम मंदिर आणि बालाजी ट्रस्टच्या जमिनीवरील कथित गैरव्यवहारावरून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला लक्ष्य केले. रामाच्या नावाने धंदा आणि लूट सुरू असल्याचा आरोप करत या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे त्यानी म्हटले आहे.

या जमिनीवर ८१० अवैध भूखंड तयार करण्यात आले असून जवळपास ८० टक्के भूखंडांची विक्री झाली असतानाही ट्रस्टींवर गुन्हा दाखल होत नसल्याचा दावा संजय राऊत यानी केला. स्थानिक पातळीवर या प्रकरणावर कोणीही बोलत नसल्याबद्दल त्यानी नाराजी व्यक्त केली. भाजपचे मंत्री आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे शिवसेनेचे नेतेही या मुद्द्यावर मौन बाळगून असल्याची टीका त्यानी केली. या कथित व्यवहारात कोणाचा सहभाग आहे, याची चौकशी होऊन सत्य समोर आले पाहिजे, अशी भूमिका त्यानी मांडली.

श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मालकीची जमीन रुग्णालय, शाळा आणि सामाजिक उपक्रमांसाठी वापरली जावी, व्यावसायिक कारणांसाठी तिचा वापर होऊ नये, अशी मागणी समीर साजिद यानी केली आहे. दुसरीकडे, रामाच्या नावाने जमीन लुटणारे कोणीही असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यानी केली आहे. त्यामुळे जाधववाडीतील ४१ एकर जमिनीवरील कथित प्लॉटिंग, भूखंडविक्री, अतिक्रमण हटाव कारवाईतील कथित हस्तक्षेप आणि गुन्हा दाखल होण्यास झालेला विलंब या सर्व मुद्द्यांवर आता महापालिका प्रशासन काय खुलासा करते, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version