Sanjay Shirsat on Sanjay Raut : लातूरमधील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या केंद्रासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. आरोप करणाऱ्यांनी आधी वस्तुस्थिती तपासावी, असे सांगत त्यांनी आपल्या कामांचा लेखाजोखाच मांडला.
संजय राऊत यांनी अलीकडील काही प्रकरणांचा आधार घेत आपल्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शिरसाट यांनी केला. उदगीरकर नावाच्या व्यक्तीने 25 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. मंत्र्याकडे अनेक प्रस्ताव येतात, त्यातील काही मंजूर होतात, तर काही फेटाळले जातात. ही प्रशासकीय प्रक्रिया असते. मात्र, या प्रस्तावाचा थेट संबंध अण्णा भाऊ साठे यांच्याशी जोडून आपल्यावर आरोप करण्यात आले, असे शिरसाट म्हणाले. महापुरुषांचे नाव लेटरहेडवर वापरायचे आणि काम झाले नाही की त्यांचाच आधार घेत बदनामी करायची, असा प्रकार सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.
अण्णा भाऊ साठे यांच्या योगदानाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या राऊत यांना शिरसाट यांनी उलट सवाल केला. उद्धव ठाकरे यांनी कधी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार घातला आहे का, असा प्रश्न विचारत त्याचा फोटो दाखवण्याचे आव्हान त्यांनी दिले. वाटेगाव येथे अण्णा भाऊ साठे यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी 50 कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पाच एकर जागेवर त्यांचे स्मारक उभारण्याचे काम हाती घेतल्याचा दावाही त्यांनी केला.
केवळ अण्णा भाऊ साठेच नव्हे, तर सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठीही सरकार काम करत असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. महाड येथील चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी 90 कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महापुरुषांच्या छायाचित्रांचा वापर केवळ राजकीय स्वार्थासाठी करू नये, असा टोला लगावत विरोधकांना सामाजिक योगदानावर बोलण्यापूर्वी स्वतःची कामगिरी तपासण्याचा सल्ला त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मंत्री केले नाही, यावरून राऊत यांनी केलेल्या विधानाचाही शिरसाट यांनी समाचार घेतला. ठाकरे यांनी मंत्रिपदासाठी आपली निवड का केली नाही, याबाबत खोचक टिप्पणी करत त्यांनी तत्कालीन मंत्रिमंडळातील नियुक्त्यांवर प्रश्न उपस्थित केले. अपक्ष आमदार शंकर गडाख यांना मंत्रिपद देण्यामागे कोणते योगदान होते, असा सवाल त्यांनी केला. अनिल परब आणि सुभाष देसाई यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरही टीका करत तत्कालीन नेतृत्वाने विशिष्ट लोकांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला.
याच पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी ठाकरे गटाला दलित आणि बौद्ध समाजाच्या प्रतिनिधित्वावरून घेरले. उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या सत्ताकाळात कोणत्या दलित किंवा बौद्ध समाजातील नेत्याला मंत्रिपद दिले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या जातीमुळे आणि आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आपल्याला डावलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी मातोश्रीच्या मागील दरवाजातून टेम्पो आत कशासाठी येत होते, असा वादग्रस्त प्रश्न उपस्थित केला. भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी स्वतःच्या कारभाराचे उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले.
सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आपण अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा शिरसाट यांनी केला. दलित विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी 1200 कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून वामनदादा कर्डक यांच्या स्मारकासाठी 14.5 कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. बौद्ध गया येथे जाऊन 10 एकर जागेची मागणी केल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्नी रुग्णालयात दाखल असतानाही आपण या कामासाठी प्रयत्न केले, असे सांगत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी आणि पदोन्नतीचे निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मंत्रिपदाच्या अधिकारांबाबत स्पष्टीकरण देताना शिरसाट यांनी गेल्या दोन वर्षांत 25 कोटी रुपयांचा एकही प्रस्ताव मंजूर केल्याचे दाखवून देण्याचे आव्हान राऊत यांना दिले. मंत्री म्हणून 10 कोटी रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा अधिकार असून त्यापुढील प्रस्तावासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा असून त्याचा गैरवापर होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले. आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांना कुठच्या कुठे लटकवून टाकेन, असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
