महादेव सट्टेबाजी रॅकेटमधील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरला ओमानमधून अटक; प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू

पाच हजार कोटी रुपयांच्या या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला ओमानची राजधानी मस्कत येथे अटक करण्यात आली आहे.

Untitled Design 21

Untitled Design 21

Saurabh Chandrakar arrested from Oman : महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात भारतीय तपास यंत्रणांना मोठं यश मिळालं आहे. तब्बल पाच हजार कोटी रुपयांच्या या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला ओमानची राजधानी मस्कत येथे अटक करण्यात आली आहे. भारत सरकारच्या विनंतीनंतर रॉयल ओमान पोलिसांनी ही कारवाई केली असून, आता त्याला भारतात आणण्यासाठी प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून फरार असलेल्या सौरभ चंद्राकरच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ चंद्राकर बनावट इंडोनेशियन पासपोर्टच्या आधारे ओमानमध्ये बेकायदेशीररित्या राहत होता. भारताने त्याच्याविरोधात दिलेल्या माहितीनंतर आणि इंटरपोलने जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे रॉयल ओमान पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला मस्कतमधील ‘अल खौद डिटेंशन सेंटर’मध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले असून, ओमान प्रशासन त्याच्या बनावट पासपोर्ट, खोटी ओळख आणि बेकायदेशीर प्रवेशासंदर्भातील सर्व बाबींची सखोल चौकशी करत आहे.

दुसरीकडे, भारतातील अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय तपास यंत्रणा आणि संबंधित मंत्रालयांनी त्याला भारतात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. भारत आणि ओमान यांच्यातील नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे, न्यायालयीन आदेश आणि पुरावे सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, प्रत्यार्पणासाठी आवश्यक सर्व औपचारिकता पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, सौरभ चंद्राकरने स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ओमानमध्ये अनुभवी वकिलांची फौज उभी केल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यार्पण प्रक्रियेला कायदेशीर आव्हान देण्याची तयारी त्याच्याकडून सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया किती काळ चालेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनी आणि व्यवहारांची तपासणी सुरू, महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत मोठी घोषणा

ईडीच्या तपासानुसार, महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्कच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांहून अधिक काळा पैसा फिरवण्यात आल्याचा संशय आहे. या नेटवर्कद्वारे देशभरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी चालवली जात होती. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन, पोकर, पत्ते यांसारख्या विविध खेळांवर सट्टा लावण्याबरोबरच निवडणुकांचे निकाल, विविध कार्यक्रम आणि इतर घटनांवरही ऑनलाइन बेटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. या अवैध व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर पैसे परदेशात वळवण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.

सौरभ चंद्राकर आणि त्याचा साथीदार रवी उप्पल यांनी 2019 नंतर दुबईतून या नेटवर्कचा विस्तार केल्याचे तपासात समोर आले आहे. भारतातील अनेक एजंट, आणि आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून हे संपूर्ण रॅकेट चालवले जात होते. या प्रकरणात अनेक राज्यांमध्ये छापेमारी करण्यात आली असून, कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच अनेक आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून तपास सुरू आहे.

या प्रकरणात यापूर्वीही मोठी कारवाई झाली होती. 2024 मध्ये इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे सौरभ चंद्राकरला संयुक्त अरब अमिरातीमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणीही केली होती. मात्र, काही कायदेशीर अडथळ्यांमुळे त्याला भारतात आणणे शक्य झाले नाही आणि अखेर त्याची सुटका झाली होती. त्याच काळात त्याचा निकटवर्तीय साथीदार रवी उप्पल युएईमधून पसार होण्यात यशस्वी ठरला होता. त्याचा शोध अद्यापही सुरू असल्याचे सांगितले जाते.

ज्येष्ठ नेते शरद पवार, राणे अन् मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक; सीमाप्रश्नावर घेतला मोठा निर्णय

आता मात्र बनावट पासपोर्टच्या आधारे ओमानमध्ये वास्तव्य करत असताना सौरभ चंद्राकरला अटक झाल्याने त्याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर, बेकायदेशीर प्रवेश आणि भारतातील आर्थिक गैरव्यवहार या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.

सौरभ चंद्राकरला भारतात आणण्यात यश आल्यास महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणातील आर्थिक व्यवहार, परदेशातील नेटवर्क, मनी लॉन्डरिंगची साखळी, हवाला व्यवहार तसेच या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींबाबत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता प्रत्यार्पण प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते आणि सौरभ चंद्राकर भारतात कधी दाखल होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version