Gyanesh Kumar : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवाचं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवलं आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवा असं (RSS) राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सांगत आहे. आता हे स्पष्ट झालं आहे की ज्ञानेश कुमार हे भाजपसाठीच काम करत आहेत. परंतु, ही लढाई चालू राहिल, आम्ही मागं हटणार नाही अशी ठाम भूमिका कॉकरोज जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी सांगितलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आशुतोष रांका यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, त्यांच्यासारखा भित्रा पंतप्रधान भारताने आतापर्यंत पाहिला नसल्याचं म्हटलं. मागील 2 दिवसांत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारताची बदनामी झाली असून, त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. मागील 72 तासांत हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आंदोलन करणार असलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी परिस्थिती बिघडवली. आम्हाला विमानातून किडनॅप केलं, असंही रांका म्हणाले. नरेंद्र मोदी देशातील सर्वात महान पंतप्रधान होऊ पाहत आहेत, मात्र आम्ही आणीबाणीविषयी ऐकलं होतं, असं त्यांनी नमूद केलं.
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेऊ नका;सुप्रीम कोर्टाचे पोलिसांना निर्देश
आमच्या आई-वडिलांकडून आणीबाणीच्या कहाण्या ऐकल्या होत्या. मात्र, मागील 72 तासांत त्या परिस्थितीची भयंकर झलक पाहायला मिळाली. 1975 साली ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या, तर काल अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या. यामुळे लाखो लोकांना त्रास सहन करावा लागला, असं आशुतोष रांका यांनी म्हटलं.
निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेली लढाई नरेंद्र मोदी यांनी स्वतःकडे वळवून घेतली आहे. ज्ञानेश कुमार यांना वाचवणार असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. राजाचा जीव पोपटात आहे, हेच त्यांनी दाखवून दिलं. निवडणूक आयोगाची जबाबदारी लोकशाही वाचवण्याची असते, मात्र आयोगाने मोदींसाठी काम केलं आणि भाजपला जिंकवण्यासाठी प्रयत्न केले, असा आरोप रांका यांनी केला.
