Shersingh is already suspended : नीट परीक्षा प्रकरणावरून दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उत्तराखंड पोलिसातील शेरसिंह नावाच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत मंचावरून आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. या घटनेची देशभरात चर्चा सुरू असतानाच उत्तराखंड पोलिसांनी शेरसिंहबाबत गंभीर माहिती समोर आणली असून या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.
20 जुलै रोजी संसद मार्चदरम्यान आंदोलनकर्त्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर पोलिसांच्या कारवाईवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे कार्यरत असलेले मूळचे हरिद्वार जिल्ह्यातील रुडकीचे रहिवासी शेरसिंह जंतर मंतर येथे पोहोचले. आंदोलनाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांना मंचावर बोलावून त्यांनी उत्तराखंड पोलीस सेवेचा राजीनामा दिल्याची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी अभिजित दीपक म्हणाले, 20 जुलैला जे घडलं त्यानंतर शेरसिंह यांनी मला सांगितलं की, गुंडागर्दी करणाऱ्यांचे संरक्षण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उभं राहणं अधिक योग्य आहे. त्यामुळे ते आता आंदोलनात सहभागी होऊ इच्छित आहेत. मंचावरून बोलताना शेरसिंह यांनी, नेत्यांना सुरक्षा देण्यापेक्षा आता मला सामान्य लोकांसाठी काम करायचे आहे. मी या आंदोलनासोबत आहे. न्यायासाठी आवाज उठवणं जर बंडखोरी मानली जात असेल, तर मी बंडखोर म्हणून ओळखलं जाण्यास तयार आहे, असे वक्तव्य केले.
नीट आंदोलन पेटण्याची चिन्हे; अभिजीत दीपके म्हणाले, अटक झाली तर लढा अधिक तीव्र होईल
भाषणानंतर शेरसिंह यांनी आपल्या खांद्यावरील उत्तराखंड पोलिसांचा बॅज काढून तो अभिजित दीपक यांच्या हाती सुपूर्द केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर उत्तराखंड पोलिसांनी अधिकृत भूमिका मांडत शेरसिंह यांच्याविरोधात गंभीर आरोप असल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेरसिंह हे 27 जून 2026 पासून पिथौरागढ येथील कर्तव्यावर अनुपस्थित होते. त्यानंतर 20 जुलै 2026 रोजी त्यांना निलंबित करण्यात आले होते.
याशिवाय, शेरसिंह यांच्यावर एका कुख्यात गुन्हेगारासोबत संगनमत करून गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. भोळ्या-भाबड्या नागरिकांना धमकावून त्यांच्या जमिनी बळकावल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी हरिद्वारमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच 15 सप्टेंबर 2025 रोजी त्यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. सध्या ते जामिनावर बाहेर असल्याची माहिती उत्तराखंड पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या आरोपांवर शेरसिंह यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या या माजी पोलिस कर्मचाऱ्याच्या भूमिकेबरोबरच त्यांच्यावरील आरोपांबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे.
