Shivam Dube Arrest : मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात लग्नाचे आश्वासन देत तरुणीचे तीन वर्षे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून एमआयडीसी पोलिसांनी शिवम दुबे उर्फ चोंग्या याला अटक केली आहे. (Mumbai) आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. या काळात तरुणीकडून लाखो रुपये तसेच महागडी कार घेतल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
दरम्यान, तीन वर्षे संबंध ठेवल्यानंतर शिवम दुबे उत्तर प्रदेशात दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत असल्याचे तरुणीला समजले. यानंतर तिने थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवत शिवम दुबे याला अटक केली. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील आंदोलन महाराष्ट्राचं जंतरमंतर; फडणवीसांपर्यंत आवाज जाऊ द्या” संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवम दुबे हा अंधेरी पूर्वेतील महाकाली परिसरात राहत असून तो शिंदे गटाचे माजी नगरसेवक कमलेश राय आणि नगरसेवक रितेश राय यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. 2023 मध्ये त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती, मात्र राजकीय दबावामुळे ही कारवाई रद्द झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याचीही पोलीसांकडून पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांत तक्रार करू नये यासाठी कमलेश राय आणि रितेश राय यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. मात्र, हा दबाव झुगारून तिने पोलिसांत धाव घेतली. आता शिवम दुबेने याच पद्धतीने आणखी कोणत्या तरुणींची फसवणूक केली आहे का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.
