महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय (Shinde) उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्रि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगर पार्ट 2 सक्रिय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उद्धव ठाकरे गटाचे तब्बल 20 पैकी 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. या आमदारांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी शिंदेंनी तीन मंत्र्यांवर सोपवल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आज दुपारी 2 वाजता दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. हा दौरा रिझर्व्ह स्वरुपाचा असल्याने दिल्लीतील त्यांच्या भेटीगाठींबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, शिंदे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून राज्यातील आगामी राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीला शिंदे उपस्थित राहणार नसून ते थेट दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे. 2 सप्टेंबरपासून सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाच्या प्रकरणावर सुनावणी सुरू होत असल्याने या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या टिमसोबतही शिंदे चर्चा करणार असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील 14 आमदारांना शिवसेनेत आणण्यासाठी कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. यापैकी काही आमदारांना सरकारमध्ये महत्वाची खाती, मंत्रिपद किंवा राज्यमंत्रीपदाची संधी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तर काही आमदारांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. या राजकीय हालचाली अंतिम टप्प्यात असल्याचा दावा असून नवरात्रौत्सवापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता. उद्धव ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या होत्या. आता खासदारांनंतर आमदारांमध्येही फूट पडल्यास ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची मुंबईतील नगरसेवकांच्या मोठ्या गटावरही नजर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर पार्ट 2 मुळे राज्याच्या राजकारणात नेमका कोणता भूकंप होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
