शिंदे, लांजेवार, निम्हण, कदम यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे ‘आठवा आदर्श माता’ पुरस्कार प्रदान

Jadhvar Group of Institutes : मातृत्वाची संकल्पना आता अधिकाधिक व्यापक होत चालली आहे. आपल्या समाजात एखाद्याचे नाव विचारल्यानंतर

Jadhvar Group Of Institutes

Jadhvar Group of Institutes : मातृत्वाची संकल्पना आता अधिकाधिक व्यापक होत चालली आहे. आपल्या समाजात एखाद्याचे नाव विचारल्यानंतर त्याच्या जातीविषयी उत्सुकता निर्माण होते. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांचे नाव घेतो, त्यामुळे मातृत्व, माणुसकी आणि मानवता या मूल्यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असे मत विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना घडविण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या भामाबाई शिंदे, ज्योती कदम, स्वाती निम्हण आणि सुनीता लांजेकर यांना आठव्या आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या ममता सपकाळ, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते. साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

विधान परिषदेचे सभापती डॉ. राम शिंदे यांच्या मातोश्री भीमाबाई शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती कदम, नगरसेवक सनी निम्हण यांच्या मातोश्री स्वाती निम्हण आणि सिने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या मातोश्री सुनीता लांजेकर यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे एका स्त्रीचा त्याग आणि योगदान असते. मात्र, एखादी महिला यशस्वी होते, तेव्हा तिच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा राहतो, तेव्हा तिला यशाची पायरी दिसते. या दोन्ही परिस्थितींमध्ये मोठा फरक आहे. स्त्रियांचे काम अनेकदा अदृश्य राहते, त्यामुळे त्यांच्या श्रमाचा वाटा आणि योगदान दुर्लक्षित होते. भारतमातेच्या संस्कृतीत मातेला जो सन्मान दिला जातो, तो अत्यंत महत्त्वाचा आहे.

ममता सपकाळ म्हणाल्या, आदर्श माता असल्याचे सिद्ध करण्याची कसोटी खूप मोठी असते. ज्यांना जन्म देता आणि ज्यांना घडवता, ते जोपर्यंत काळाच्या कसोटीवर उतरत नाहीत, तोपर्यंत आपण आदर्श माता म्हणून सिद्ध होत नाही. सर्वाधिक गृहीत धरले जाते ते आईला. घराला घरपण आईमुळेच मिळते. घर पुढे जात असते; मात्र या प्रवासात सर्वांत शेवटी उभी असते ती आई. आपला संस्कारांचा वसा आपण जपत असतो. आपण दिलेला हा वसा जेव्हा समाजाच्या उपयोगी ठरतो, तेव्हा तीच आईसाठी खरी कृतज्ञता असते.

ज्योती कदम म्हणाल्या, हा केवळ सन्मान नसून माझ्या मातृत्वाला मिळालेली प्रेमाची आणि कृतज्ञतेची पावती आहे. आई होणे ही कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर आणि तितकीच जबाबदारीची भूमिका आहे. मुलांना केवळ सुख-सुविधा देऊ नका, तर त्यांच्यात संस्कार, आत्मविश्वास आणि चांगली मूल्ये रुजविण्याचे काम करा.

सुनीता लांजेकर म्हणाल्या, कोणतीही आई स्वतःला आदर्श आई समजत नाही. ती केवळ आपल्या मुलांसाठी जे आवश्यक आहे, ते करत राहते. त्यांच्या आनंदात आनंदी होते आणि अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. मुलांना मोठे करणे म्हणजे केवळ त्यांना यशस्वी बनवणे नव्हे, तर त्यांना एक चांगला माणूस घडवणे हे आईच्या हातात असते.

स्वाती निम्हण म्हणाल्या, आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांच्या संयोगातून निर्माण झालेली शक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातेने घडविले, हे राजमाता जिजाऊंचे महान कार्य आणि कर्तव्य होते. जसे माझ्या आईने मला घडविले, तसेच मीही माझ्या मुलांना घडविण्याचा प्रयत्न केला.

सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताओ प्रोग्रॅम ; CM फडणवीसांचा हल्लाबोल

ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीतून आयुष्याचा प्रवास करत, आपल्या मुलांना विविध क्षेत्रांत घडविणाऱ्या माता समाजासमोर आल्या पाहिजेत. आज त्यांची मुले देशसेवेचे कार्य करत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. अशा मातांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आईची महती आणि तिचे योगदान प्रत्येक युवकाला व विद्यार्थ्याला समजले पाहिजे.

follow us