अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो हटवला, पुण्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता; भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी
या दौऱ्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांच्या फोटोवरून निर्माण झालेला वाद आता मनसे विरुद्ध भाजप संघर्षाचे नवे कारण ठरण्याची चिन्हे आहेत.
पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (MNS) यांच्या सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील दौऱ्याला आता राजकीय रंग चढला आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचले होते. कँटिनमधील जेवणाची गुणवत्ता तसेच स्पोर्ट्स कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षकाची उपलब्धता याबाबत त्यांनी महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांकडं विचारणा केली. याचवेळी कार्यालयात लावलेल्या एका फोटोमुळं अमित ठाकरे आणि भाजपमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे.
मुख्याध्यापकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे एका विद्यार्थ्याने अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर अमित ठाकरे यांनी महाराज आणि डॉ. बाबासाहेबांच्या शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्याचे कारण काय, अशी विचारणा केली. काही वेळातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा फोटो तेथून हटवला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून पुण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यात गणेशोत्सवात डीजेचा दणदणाट नको, शहराबाहेरुनच मिरवणूक काढा’; एका पुणेकराची मागणी
फोटो हटवण्याच्या कृतीवर अमित ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शासकीय महाविद्यालयात पंतप्रधानांचा फोटो लावण्याचा प्रोटोकॉल असेल तर तो फोटो अन्य ठिकाणी लावण्यात यावा, मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी तो लावू नये, असं त्यांनी म्हटलं. नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी होऊ शकत नाही, असं सांगत महाराजांचा अपमान मनसे सहन करणार नसल्याचा इशाराही अमित ठाकरे यांनी दिला. भाजप नेत्यांनी या कृतीचा निषेध करण्याआधी महाराज आणि मोदी यांची अशी मांडणी त्यांना मान्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला
दरम्यान, अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्याचा आरोप करत अमित ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सरकारी कार्यालयांमध्ये ठरावीक प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची छायाचित्रे लावली जातात, त्यामुळं फोटो हटवण्यापूर्वी अमित ठाकरेंनी संबंधित नियम समजून घ्यायला हवा होता, असा टोला त्यांनी लगावला. अमित ठाकरे हे मनसेचे नवीन नेते असून, आता ते घराबाहेर पडले आहेत, त्यामुळं त्यांना सरकारी प्रोटोकॉलची माहिती नसावी, अशी टीकाही बन यांनी केली.
याच मुद्द्यावर पुणे महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनीही अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हा केवळ नरेंद्र मोदींचा फोटो नसून भारताच्या पंतप्रधानांचा फोटो आहे, असं सांगत शासकीय कार्यालयात प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची छायाचित्रं लावली जातात, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून देशाचे घटनात्मक पद आहे, त्यामुळं अशा प्रकारे फोटो हटवण्याच्या कृतीचा आपण निषेध करतो, असं बीडकर यांनी म्हटलं. अमित ठाकरेंना प्रोटोकॉलची माहिती नसेल किंवा ते देशाच्या पंतप्रधानांनाच मानत नसतील, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली
अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा उद्देश मात्र केवळ या वादापुरता मर्यादित नाही. ते पुण्यातील एकूण 7 महाविद्यालयांना भेट देत Gen Z विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्याबरोबरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. शैक्षणिक भ्रष्टाचाराविरोधात ‘दहीहंडी’, विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी ‘रक्षाबंधन’, वाडिया महाविद्यालय परिसरातील सिगारेट आणि गुटखा विक्रीविरोधात कारवाईची मागणी तसेच माता रमाई आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन अशा उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, या दौऱ्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधानांच्या फोटोवरून निर्माण झालेला वाद आता मनसे विरुद्ध भाजप संघर्षाचे नवे कारण ठरण्याची चिन्हे आहेत.