दहशतवादाविरोधात ठोस भूमिका; व्यापार आणि जागतिक प्रतिनिधित्वावर भर, BRICS परिषदेत भारताला काय मिळालं?

BRICS Summit Update : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रचनेत सुधारणा करण्याची मागणीही दिल्ली घोषणापत्रातून करण्यात आली आहे.

News Photo   2026 09 13T201509.655

BRICS Summit Update

BRICS Summit Update : जगाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचं (BRICS) प्रतिनिधित्व करणाऱ्या BRICS देशांची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. जागतिक अर्थव्यवस्थेत 40 टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या या गटाच्या परिषदेत 11 सदस्य देश, 12 भागीदार देश आणि संयुक्त राष्ट्रांसह 5 आंतरराष्ट्रीय संस्थांनी सहभाग घेतला. तीन दिवसांच्या चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या दिल्ली घोषणापत्रातून दहशतवाद, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक सहकार्य आणि जागतिक संस्थांमधील सुधारणांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

परिषदेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा दहशतवादाचा होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत दहशतवादाला मिळणारा आर्थिक पाठिंबा रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्यावर सदस्य देशांमध्ये सहमती झाली. यासोबतच युद्ध आणि लष्करी कारवाईदरम्यान व्यावसायिक जहाजांच्या मार्गांवर निर्माण होणारे प्रश्न शांततामय चर्चेतून सोडवण्याची भूमिका घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे मार्ग सुरक्षित ठेवण्यावरही BRICS देशांनी भर दिला.

भारताकडून ब्रिक्स शिखर परिषदेचं दिमाखदार आयोजन; परिषदेतील ही खास छायाचित्रं खूप काही सांगून जातात

2026 ते 2030 या कालावधीतील ग्लोबल व्हॅल्यू चेन मजबूत करण्यावरही परिषदेत चर्चा झाली. सदस्य देशांनी परस्पर बाजारपेठा अधिक खुल्या करण्यासोबतच व्यापार आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला. कोणताही विचार न करता लादल्या जाणाऱ्या एकतर्फी शुल्कांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. पर्यावरणीय बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी BRICS रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन सहकार्य करारालाही मंजुरी देण्यात आली.

दरम्यान, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या रचनेत सुधारणा करण्याची मागणीही दिल्ली घोषणापत्रातून करण्यात आली. ग्लोबल साऊथच्या देशांना अधिक प्रतिनिधित्व मिळावं, अशी भूमिका सदस्य देशांनी पुन्हा एकदा मांडली. त्यामुळे दहशतवादाविरोधातील सहकार्यापासून पर्यावरणीय निरीक्षण आणि जागतिक संस्थांमधील सुधारणांपर्यंत विविध मुद्द्यांवर BRICS देशांनी एकत्रित भूमिका स्पष्ट केली आहे.

Exit mobile version