Play School Fees: आजच्या या महागाईच्या काळात आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकांची धडपड सुरु असते. गेल्या काही वर्षात देशात शिक्षणाचा खर्च झपाट्याने वाढल्याने अनेकांचे बजेट देखील बिघडले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये दिल्लीतील एका सीएने आपली वेदना मांडून वाढत असणाऱ्या शिक्षणाच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी लिहिले की माझ्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च माझ्या मुलाच्या प्ले स्कूलच्या फीएवढा नाही.
प्ले स्कूल फी प्रति वर्ष 4.3 लाख रुपये
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिल्लीमधील सीए आकाश कुमार यांनी लिहिले की, माझ्या मुलाच्या प्ले स्कूलची फी माझ्या संपूर्ण शिक्षणादरम्यान खर्च केलेल्या रकमेपेक्षा जास्त आहे. माझ्या मुलाची प्ले स्कूलची वार्षिक फी 4.3 लाख रुपये आहे. आकाशने या पोस्टसबोत एक स्क्रीनशॉटही जोडला आहे, ज्यामध्ये मुलांच्या प्ले स्कूलच्या फीचा ब्रेकडाऊन आहे.
पोस्ट व्हायरल, प्रतिक्रियांचा पाऊस
X वर आकाशची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. आतापर्यंत त्यांच्या पोस्टला 20 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहे तर 15 हजारपेक्षा जास्त लाईक्स आणि 2100 हुन जास्त रिट्विट्स तर हजारो कमेंट त्यांच्या पोस्टवर आले आहे.
या पोस्टवर यूजर्स आता मजेशीर कमेंट्स करत आहे तर काहींना फीस पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका युजरने लिहिले आहे की, सरकारी शाळांच्या दुरवस्थेमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, आज पालक फॅन्सी इमारत आणि सुविधांची मागणी करतात यामुळे त्यांना ही फी मोजावी लागत आहे.
देशात असणाऱ्या गोरगरिबांचा विचार करून आता खरोखरच झपाट्याने वाढत असणाऱ्या या शिक्षणाच्या खर्चावर काही उपाय शोधण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहे.