Shiv Sena Whip to Six MP : डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांना आजच्या बैठकीसाठी पक्षाकडून व्हीप बजावण्यात आला आहे. या खासदारांनी बैठकीला उपस्थित राहून विधेयकाच्या विरोधात भूमिका घ्यावी, अशी पक्षाची भूमिका आहे. व्हीपचे उल्लंघन केल्यास संबंधित खासदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणात आता ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महत्त्वाचे घटनात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत. मूळ शिवसेनेतून बाहेर पडलेल्या सहा खासदारांना उद्धव ठाकरे यांच्या कायदेशीर खेळीचा सामना कसा करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे सहा खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदे गटात सामील झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सरोदे यांच्या मते, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या सहा खासदारांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आणि त्यांच्यासाठी वेगळी आसनव्यवस्था केली. मात्र, या खासदारांविरोधात संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद 2(1)(अ) अंतर्गत पक्षविरोधी वर्तन केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी या सहा खासदारांना अधिकृतपणे पक्षातून काढलेले नसल्याने तांत्रिकदृष्ट्या ते अद्याप शिवसेनेचे सदस्य असल्याचा मुद्दा सरोदे यांनी मांडला आहे.
Delimitation Bill : पवारांच्या राष्ट्रवादीत पहिला राजीनामा पडला; विचारांशी केलेली गद्दारी
याच कायदेशीर बाबीचा आधार घेत ठाकरे गटाने सहा खासदारांना डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा व्हीप बजावला आहे. त्यामुळे या खासदारांसमोर आता मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार विधेयकाच्या विरोधात मतदान केले नाही किंवा विधेयकाच्या बाजूने मतदान केले, तर त्यांच्या सदस्यत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. सरोदे यांनी यासाठी संविधानातील दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद 2(1)(ब) या तरतुदीकडे लक्ष वेधले आहे.
भारतीय संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद 2(1)(ब) नुसार, एखाद्या खासदाराने किंवा आमदाराने आपल्या राजकीय पक्षाने जारी केलेल्या अधिकृत व्हीपच्या विरोधात मतदान केले किंवा मतदानापासून जाणीवपूर्वक दूर राहिले, तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. मात्र, अशा कृतीसाठी पक्षाची पूर्वपरवानगी असणे आवश्यक आहे. तसेच पक्षाने केलेली कृती माफ केल्यास अपात्रतेचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे पक्षाचा आदेश डावलणे हे लोकप्रतिनिधींसाठी घटनात्मकदृष्ट्या गंभीर ठरू शकते.
दरम्यान, ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांची कोंडी होण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन विधेयकावर मतदान करताना त्यांनी कोणती भूमिका घ्यायची, हा त्यांच्यासमोरचा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. एका बाजूला शिंदे गटाची राजकीय भूमिका आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने बजावलेला व्हीप, अशा दुहेरी पेचात हे खासदार अडकले आहेत. आता या प्रकरणात लोकसभा अध्यक्ष आणि संबंधित घटनात्मक यंत्रणा काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
