पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गट (PM) आणि तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या खासदारांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्याने महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापले आहे. या भेटीदरम्यान मोदी यांनी संबंधित खासदारांना ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे’, असा विश्वास दिल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला.
फुटीर खासदारांच्या पक्षांतराशी संबंधित प्रकरणांची न्यायालयीन सुनावणी सुरू असताना पंतप्रधानांनी त्यांची भेट घेण्याची गरज काय होती, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘या भेटीतून नेमका कोणाला संदेश द्यायचा होता? अमित शाह यांना, देवेंद्र फडणवीस यांना की न्यायालयाला?’ असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाकडून दिवसभर मोदी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली. सकाळी खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून पंतप्रधानांवर निशाणा साधला. त्यानंतर दुपारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत याच मुद्द्याला हात घालत मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Shiv Sena : शिवसेना खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला
उद्धव ठाकरे म्हणाले की, न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू असताना फुटीर खासदारांना पंतप्रधानांनी भेटणे आणि त्यांना ‘भिऊ नका’ असे सांगणे यामागचा उद्देश काय? ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे’ हा केवळ दिलासा देणारा संदेश होता की त्यामागे आणखी काही राजकीय संकेत होते, हे स्पष्ट झाले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
मोदींच्या ‘भिऊ नका’ या कथित आश्वासनावरून उद्धव ठाकरे यांनी उपरोधिक टीका केली. स्वामी समर्थांचा ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा संदेश प्रसिद्ध आहे. आता मोदीही फुटीर खासदारांना ‘भिऊ नका’ म्हणत आहेत. त्यामुळे ‘मोदी नवे स्वामी समर्थ झाले आहेत का?’ असा सवाल ठाकरे यांनी केला. ‘मोदी आंदोलकांना भेटत नाहीत, विद्यार्थ्यांना भेटत नाहीत. मात्र, फुटीर खासदारांना भेटतात आणि त्यांना मी तुमच्या पाठिशी आहे, असे सांगतात,’ अशी टीका त्यांनी केली.
‘इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे का?’
मोदींच्या संवादाच्या पद्धतीवरही ठाकरे यांनी भाष्य केले. कोविडच्या काळात आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होतो, तेव्हा आपल्यावर टीका करण्यात आली. मात्र आता पंतप्रधान तरुणांशी थेट संवाद साधण्याऐवजी समाजमाध्यमांवरून संदेश देत आहेत, असे ठाकरे म्हणाले. तसंच, ‘मध्यरात्री फ्रेंड्स म्हणून इन्स्टाग्रामवरून संदेश दिले जात आहेत. आता इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे का?’ असा टोला त्यांनी लगावला.
‘संदेश नेमका कुणाला?’
फुटीर खासदार आणि मोदी यांच्यातील चर्चा बंद दाराआड झाली असेल, तर त्यातील काही वाक्ये बाहेर येण्याचे कारण काय, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी आहे’ हा संदेश नेमका कुणासाठी होता, हे पंतप्रधानांनी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. त्यामुळे मोदींचा हा संदेश शिंदे यांच्यासाठी होता का, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
‘शिंदे पूर्वी अमित शाह यांना भेटायचे. आता मोदींना भेटत आहेत. अमित शाह महाराष्ट्रात असताना मोदींची भेट घेण्यामागे नेमका संदेश काय आहे? भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, हा धमकीवजा संदेश कुणाला दिला? अमित शाहांना, न्यायालयाला की देवेंद्र फडणवीसांना?’ असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
फुटीर खासदारांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना पंतप्रधानांची ही भेट आणि त्यातून समोर आलेले कथित आश्वासन यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
