जरांगे पाटलांचं उपोषण कसं होतं ते वेळ आल्यावर सांगणार; ज्या महिलेने उपोषण सोडलं त्याच महिलेचे गंभीर आरोप
Jarange Movement : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून ललिता तारख यांनी गंभीर आरोप करत, माता माऊल्यांना फसवलं असा घणाघात केला आहे.
Manoj Jarange Hunger Strike Update : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं उपोषण स्थगित केल्यानंतर अंतरवाली सराटीत आता वेगळ्याच घडामोडींना वेग आला आहे. (Jarange) जरांगे यांनी सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ दिला असून, मुंबईकडे निघालेलं आंदोलनही त्यांनी मध्येच स्थगित केलं. त्यानंतर अंतरवाली सराटीतील ग्रामस्थ आणि सरपंचांनी उपोषणासाठी उभारलेला मंडप आणि व्यासपीठ हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे यांनी गावकऱ्यांना आश्वासन देऊन महिलांची दिशाभूल केली आणि भावनिक मुद्द्यांचा वापर करून महिलांना आंदोलनात सहभागी करून घेतलं, असा दावा तारख यांनी केला आहे. आंदोलनासाठी आपण आणि इतर महिलांनी रात्रंदिवस मेहनत घेतली, मात्र अपेक्षित परिणाम मिळाला नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अंतरवालीतील व्यासपीठ का हटवलं? दुष्काळाच्या GR वरून मुंबई आंदोलनापर्यंत; जरांगे स्पष्टच बोलले
अंतरवाली सराटीमध्ये अद्याप एकही कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं नसल्याचा दावा तारख यांनी केला. हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण मिळेल, असं आश्वासन जरांगे यांनी दिलं होतं, मात्र त्यानुसार अद्याप अपेक्षित कार्यवाही झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे आपण 10 महिन्यांपूर्वी अर्ज केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जरांगे यांच्या उपोषणाच्या पद्धतीवरही तारख यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाच्या काळातील घडामोडींची आपण साक्षीदार असल्याचं सांगत, योग्य वेळ आल्यावर आपण याबाबत बोलेन, असं त्यांनी म्हटलं आहे. उपोषणस्थळावरून शिवीगाळ करणं योग्य नाही, तसंच जिल्हाधिकाऱ्यांबद्दल वापरण्यात आलेली भाषा योग्य नव्हती, अशी टीकाही त्यांनी केली.
यापूर्वी उपोषणाचा मंडप हटवण्यास पोलिसांना विरोध केल्याचंही तारख यांनी सांगितलं. मात्र आता जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर अंतरवाली सराटीतील ग्रामस्थ आणि सरपंचांनी मंडप व व्यासपीठ हटवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन समाजाला दिशा दिली, त्यामुळे आंदोलन करताना भाषेचं आणि पद्धतीचं भान ठेवणं गरजेचं असल्याचं मत तारख यांनी व्यक्त केलं आहे.