दिवाळीच्या खरेदीत डिजिटल क्रांती, किराणा सामानासोबत आता सोन्या-चांदीची नाणीही काही मिनिटांत घरपोच!

लोक घरबसल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सोन्या-चांदीची नाणी ऑर्डर करत असून, काही मिनिटांतच ही नाणी त्यांच्या दारात पोहोचत आहेत.

Untitled Design   2026 11 07T201330.276

Untitled Design 2026 11 07T201330.276

A Digital Revolution in Diwali Shopping : दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोनं-चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. पूर्वी या मुहूर्तावर लोक दागिन्यांच्या दुकानात जाऊन सोन्या-चांदीची नाणी आणि दागिने खरेदी करायचे. मात्र, आता हा ट्रेंड वेगाने बदलताना दिसत आहे. लोक घरबसल्या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून सोन्या-चांदीची नाणी ऑर्डर करत असून, काही मिनिटांतच ही नाणी त्यांच्या दारात पोहोचत आहेत. या बदलत्या ट्रेंडचा फायदा क्विक कॉमर्स कंपन्यांना होत आहे. झेप्टो, स्विगी इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि फ्लिपकार्ट मिनिट्स यांसारखे प्लॅटफॉर्म सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या नाण्यांची डिलिव्हरी करत आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, दिवाळीच्या काळात क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सोन्या-चांदीच्या नाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या प्लॅटफॉर्मवरून दर तासाला सुमारे 14 हजार नाण्यांची डिलिव्हरी केली जात असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. यावरून सणासुदीच्या काळात पारंपरिक खरेदीसोबतच ऑनलाइन खरेदीलाही ग्राहकांची पसंती मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे.

क्विक कॉमर्स अ‍ॅप्सवर ग्राहकांना वेगवेगळ्या वजनाची सोन्या-चांदीची नाणी खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे. ग्राहक आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार नाण्यांची निवड करून ऑर्डर देऊ शकतात. अनेक शहरांमध्ये ही नाणी अवघ्या काही मिनिटांत घरपोच पोहोचवली जात आहेत. मात्र, ही सुविधा सर्वच ठिकाणी उपलब्ध नाही. ग्राहकाच्या पिनकोडनुसार उत्पादनांची उपलब्धता आणि डिलिव्हरी अवलंबून असते.

पेट्रोलमध्ये 30 टक्क्यांपर्यंत इथेनॉल? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल, ‘E20 को 420’ म्हणत साधला निशाणा!

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात दागिन्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होते. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी अनेक ग्राहक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या ब्रँडच्या नाण्यांच्या किमतींची तुलना करणंही सोपं झालं आहे. याशिवाय कंपन्यांकडून सणासुदीच्या काळात विशेष ऑफर्स आणि सवलतीही दिल्या जात आहेत.

अहवालानुसार, स्विगी इन्स्टामार्टवर सोन्या-चांदीच्या नाण्यांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचपट वाढ झाली होती. तर बिगबास्केटवर सोन्याच्या नाण्यांच्या विक्रीत 146 टक्के आणि चांदीच्या नाण्यांच्या विक्रीत 234 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. क्विक कॉमर्स कंपन्या आता केवळ किराणा सामान, फळं, भाजीपाला आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या विक्रीपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. सणासुदीच्या काळात या प्लॅटफॉर्मवर सोन्या-चांदीची नाणी, पूजेचं साहित्य, मिठाई आणि भेटवस्तूही उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

यामुळे कंपन्यांना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळत आहे. विशेषतः ऐनवेळी खरेदी करणारे ग्राहक या अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे दिवाळी आणि धनत्रयोदशीसारखे सण क्विक कॉमर्स कंपन्यांसाठी कमाईची मोठी संधी ठरत आहेत. अशा प्रकारे, सोनं-चांदी खरेदीची पारंपरिक पद्धत आता डिजिटल डिलिव्हरीच्या नव्या युगात प्रवेश करत आहे.

Exit mobile version