Flipkart GOAT Sale च्या नावाखाली सायबर फसवणूक; पोलिसांचा इशारा नेमका काय?
Flipkart Goat Sale Alert ग्राहक जाहिरातींवर क्लिक करताच त्यांना फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटसारखी दिसणाऱ्या बनावट पोर्टलवर किंवा...
Flipkart Goat Sale Alert : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टची ‘GOAT Sale’ सुरू असताना सायबर गुन्हेगारांनी याच सेलचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. ‘Flipkart GOAT Sale’च्या नावाखाली बनावट फेसबुक पेज, खोट्या जाहिराती आणि फेक वेबसाइट्स तयार करून ग्राहकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा इशारा केरळ पोलिसांनी दिला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फसवणूक करणारे ‘Flipkart GOAT Sale’, ‘GOAT Sale Live’, ‘Offer Sale’ आणि ‘FK GOAT Offer’ अशा नावांचे फेसबुक पेज तयार करत आहेत. हे पेजेस आणि जाहिराती अधिकृत फ्लिपकार्टसारख्या दिसत असल्याने अनेक ग्राहक त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत.
जाहिरातीवर क्लिक करताच सुरू होतो फसवणुकीचा डाव
या बनावट जाहिरातींमध्ये मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अविश्वसनीय सवलतींचा दावा केला जातो. ग्राहक जाहिरातींवर क्लिक करताच त्यांना फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटसारखी दिसणाऱ्या बनावट पोर्टलवर किंवा थेट एका वैयक्तिक व्हॉट्सॲप नंबरवर पाठवले जाते. यानंतर घोटाळेबाज ‘मर्यादित स्टॉक’, ‘ऑफर काही मिनिटांत संपणार’ अशा संदेशांद्वारे ग्राहकांवर मानसिक दबाव आणतात. त्यानंतर बुकिंग रक्कम, डिलिव्हरी शुल्क, ऑफर कन्फर्मेशन फी किंवा इतर कारणे सांगून आगाऊ पैसे भरायला लावतात. एकदा पैसे जमा झाल्यानंतर ‘प्रोडक्ट स्टॉकमध्ये नाही’, ‘ऑर्डर होल्डवर आहे’ अशी कारणे देत आणखी पैशांची मागणी केली जाते. शेवटी संपर्क तोडून ग्राहकांची फसवणूक केली जाते.
अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय
केरळ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा सायबर घोटाळा केवळ फेसबुकपुरता मर्यादित नसून इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरही अशाच प्रकारच्या बनावट ऑफर्स प्रसारित केल्या जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील कोणत्याही आकर्षक ऑफरवर विश्वास ठेवण्यापूर्वी तिची खातरजमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?
– फ्लिपकार्टच्या ऑफर्सची माहिती केवळ अधिकृत ॲप किंवा वेबसाइटवरूनच तपासा.
– सोशल मीडियावरील लिंकवर क्लिक करून पेमेंट करू नका.
– कोणत्याही वैयक्तिक व्हॉट्सॲप नंबरवर पैसे पाठवू नका.
– अविश्वसनीय सवलती किंवा अत्यंत कमी किंमतीच्या ऑफर्सबाबत सावध रहा.
– वैयक्तिक माहिती, बँक तपशील किंवा OTP कोणाशीही शेअर करू नका.
सायबर तज्ज्ञांच्या मते, मोठ्या सेलच्या काळात ग्राहकांच्या घाईचा आणि आकर्षक ऑफर्सच्या मोहाचा फायदा घेऊन अशा फसवणुकीचे प्रकार वाढतात. त्यामुळे कोणतेही पेमेंट करण्यापूर्वी संबंधित वेबसाइट, लिंक आणि विक्रेत्याची सत्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे.