अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या आईची सायबर फसवणूक; पोलिसांनी 35 हजार रुपये परत मिळवून दिले

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तातडीने कारवाई करत फसवणुकीची संपूर्ण 35 हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (58)

Actress Bhargavi Chirmule’s mother falls victim to cyber fraud : पुण्यातील प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या मातोश्री स्वाती शिरीष चिरमुले यांची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती. मात्र वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने तातडीने कारवाई करत फसवणुकीची संपूर्ण 35 हजार रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात राहणाऱ्या स्वाती शिरीष चिरमुले यांना 23 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एमएनसी गॅस कनेक्शनची बिल थकीत असल्याचे सांगत व्हिडिओ कॉल करण्यात आला. संबंधित कॉल करणार्याने विविध सूचना देत त्यांची दिशाभूल केली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 35 हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने वळती करण्यात आली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच स्वाती चिरमुले यांनी तात्काळ सायबर कक्षात तक्रार दाखल केली. ही तक्रार वारजे माळवाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण, बँक खात्यांची ताहिती आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत संबंधित फसवणूक करणाऱ्यांचे खाते गोठवण्यात आले.

भारतीय बॅडमिंटनसाठी अभिमानाचा क्षण; पी. व्ही. सिंधू जपान ओपन जिंकणारी पहिली भारतीय, सुपर 750 किताबावरही कोरले नाव

त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून फसवणुकीची संपूर्ण 35 हजार रुपयांची रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले. 18 जुलै 2026 रोजी ही रक्कम स्वाती चिरमुले यांच्या खात्यात जमा करण्यात आली. दरम्यान, अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि त्यांच्या मातोश्री स्वाती चिरमुले यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात भेट देऊन पोलिसांचे आभार मानले. सायबर गुन्ह्यांमध्ये वेगवान आणि प्रभावी कारवाई करत नागरिकांचा विश्वास संपादन केल्याबद्दल पोलिसांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

या प्रकरणातील कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोलकोटे यांच्या नेतृत्वाखाली सायबर पथकाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे तसेच पोलिस अंमलदार रविंद्र गाडे आणि शशिकांत गोहिणे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अनोळखी व्हिडिओ कॉल, लिंक किंवा आर्थिक व्यवहारांबाबत सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आणि जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

follow us