5 वर्षे व्हेगन डाएट केल्यानंतर बेअर ग्रिल्स यांनी बदलला आहार, मांसाहार सुरू करण्यामागे नेमकं काय घडलं?

पाच वर्षे व्हेगन डाएट केल्यानंतर शरीराची ताकद कमी झाल्याचं जाणवलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या आहारात मोठा बदल केल्याचं सांगितलं आहे.

Untitled Design   2026 10 26T110533.595

Untitled Design 2026 10 26T110533.595

Bear Grylls changed his diet : ‘Man Vs. Wild’ या लोकप्रिय शोमधून जगभरात प्रसिद्ध झालेले बेअर ग्रिल्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या साहसी मोहिमांमुळे नव्हे, तर त्यांच्या आहारातील बदलामुळे त्यांची चर्चा सुरू आहे. तब्बल पाच वर्षे व्हेगन डाएट केल्यानंतर शरीराची ताकद कमी झाल्याचं जाणवलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या आहारात मोठा बदल केल्याचं सांगितलं आहे. बेअर ग्रिल्स यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आहारात लिव्हर, हार्ट आणि किडनी यांसारख्या अवयवांच्या मांसाचा समावेश केला.

या बदलानंतर आपली फिटनेसची स्थिती सुधारल्याचा अनुभवही त्यांनी व्यक्त केला. वयाच्या 52 व्या वर्षी आपण दहा वर्षांपूर्वीपेक्षाही अधिक फिट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे व्हेगन डाएट, मांसाहार आणि शरीराला आवश्यक पोषक घटक याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्या मते, या अवयवांच्या मांसामध्ये व्हिटॅमिन बी12, लोह, प्रथिने आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळू शकतात. हे घटक शरीरातील ऊर्जा निर्मिती, लाल रक्तपेशींची निर्मिती आणि स्नायूंच्या कार्यासाठी महत्त्वाचे असतात. विशेषतः व्हिटॅमिन बी12 आणि लोहाची कमतरता असल्यास थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

मात्र, याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने ताकद वाढवण्यासाठी ऑर्गन मीट खायलाच हवं, असा होत नाही. योग्य नियोजन केलेला व्हेगन आहारही शरीराला आवश्यक पोषण देऊ शकतो. डाळी, कडधान्ये, सोया, टोफू, सुकामेवा आणि बिया यांसारख्या पदार्थांमधून प्रथिने आणि इतर पोषक घटक मिळू शकतात. मात्र, व्हेगन आहार घेणाऱ्यांनी विशेषतः व्हिटॅमिन बी12, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि झिंक यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदे? धनुष्यबाणाचा फैसला कधी होणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी तारीख

लिव्हरमध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे त्याचं अतिसेवन केल्यास शरीरात व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त होऊन आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणताही पदार्थ पौष्टिक असला, तरी त्याचं सेवन योग्य प्रमाणात करणं महत्त्वाचं आहे. तसंच, सतत थकवा जाणवणं किंवा शरीराची ताकद कमी होणं यामागे केवळ आहारच कारणीभूत असेल असं नाही. झोपेची कमतरता, ताणतणाव, रक्तातील लोहाची कमतरता किंवा इतर आरोग्यविषयक समस्या यांचाही त्यामागे संबंध असू शकतो. त्यामुळे अशी लक्षणं सतत जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

एकूणच, बेअर ग्रिल्स यांच्या आहारातील बदलामुळे व्हेगन डाएट आणि मांसाहार याविषयी चर्चा सुरू झाली असली, तरी फिटनेसचं एकच ठरावीक सूत्र नाही. शरीराची गरज, योग्य पोषण, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप या सगळ्यांचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कोणताही आहार निवडताना तो संतुलित आणि आपल्या शरीराला आवश्यक पोषण देणारा असणं सर्वांत महत्त्वाचं आहे.

Exit mobile version