Dalai Lama First Grammy Meditations Billie Eilish Song Of The Year : परंपरेने आध्यात्म म्हणजे एकांत, मौन, साधना आणि अंतर्मुखता तर, पॉप संस्कृती म्हणजे झगमगाट, प्रसिद्धी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे माध्यम. या दोन टोकांच्यामध्ये एक व्यक्तिमत्त्व विलक्षण सहजतेने उभे राहते आणि ते म्हणजे तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा. नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आलेले दलाई लामा या व्यक्तिमत्त्वाने आता थेट ग्रॅमी पुरस्कार जिंकत पॉप-संस्कृतीतही पाऊलं टाकले आहे त्यांचे हे पाऊलचं त्यांच्या व्यापक प्रभावाची साक्ष देते.
जगाला शांतता आणि अहिंसेची शिकवण देणारे तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी वयाच्या ९० व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकलाय. 68 व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार समारंभात दलाई लामा यांना ‘मेडिटेशन्स: द रिफ्लेक्शंस ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा’ या त्यांच्या ऑडिया बुकसाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलयं. दलाई लामा यांना ‘सर्वोत्तम ऑडिओ बुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग’ या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या अल्बममध्ये ध्यानाचे सखोल बारकावे आणि जीवनातील त्यांचे अनुभव मांडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पुरस्कारामुळे ते या वर्षी पहिल्यांदाच ग्रॅमी जिंकणाऱ्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग आणि के-पॉप स्टार्सच्या यादीत सामील झाले आहेत. दलाई लामा यांचा हा अल्बम ध्यानात्मक संगीत आणि दलाई लामांचे शांत, आश्वासक शब्द यांचा संगम आहे. त्यांच्या याच आध्यत्म ते पॉपपर्यंतच्या प्रवासावर टाकलेली ही छोटीशी नजर…
6 जुलै 1935 तिबेटमधील एका छोट्या गावात दलाई लामा यांचा जन्म झाला. दलाई लामा’ या शब्दाचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. सध्याचे दलाई लामा हे 14 वे दलाई लामा असून त्यांचे नाव तेन्झिन ग्यात्सो (Tenzin Gyatso) असे आहे. अवघ्या दोन वर्षांचे असतानाच त्यांची तिबेटमधील सर्वोच्च आध्यात्मिक गुरू म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी समर्पित केले. तिबेटचा प्रश्न हिंसाचार न करता, शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल 10 डिसेंबर1989 मध्ये त्यांना नोबेल शांती पुरस्काराने गौरविण्यात आले.
आनंद ही लक्झरी नाही, तर सरावाने मिळणारी अवस्था
दलाई लामांचे विचार करुणा, अहिंसा, सहअस्तित्व आणि मनाची शांती या बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहे. त्यांनी आयुष्यभर राजकारणापेक्षा मानवतेला केंद्रस्थानी ठेवल्याचे वेळोवेळी अधोरेखित झालयं. त्यांची प्रवचनं केवळ भिक्षूंनाच नव्हे, तर सामान्य माणसालाही लागू पडणारे आहेत. “आनंद ही लक्झरी नाही, तर सरावाने मिळणारी अवस्था आहे” असा त्यांचा साधा पण, खोल संदेश त्यांनी जगभर पोहोचला आहे. दलाई लामा यांनी वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेप्रमाणेच अध्यात्म्याचा प्रचार आणि प्रसार केला असे नाही तर, काळानुरूप बदलत चाललेली पारंपरिक चौकटी मोडत सोशल मीडिया, मुलाखती, डॉक्युमेंटरीज, आणि आता ऑडिओ-अल्बमच्या माध्यमातून त्यांनी आध्यात्माला आधुनिक भाषेत मांडलं आहे.
आध्यात्म हे जुनाट नाही, तर कालातीत आहे
आज पॉप संस्कृती म्हणजे केवळ करमणूक नाही, तर विचार पोहोचवण्याचे प्रभावी साधन असल्याचे दलाई लामांनी अगदी अचूक ओळखले आणि त्यादिशेने कामही सुरू केलं आणि आता थेट संगीत क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारावरही नाव कोरलं. विशेष म्हणजे सेलिब्रिटी कलाकार, आंतरराष्ट्रीय संगीतकार आणि तरुण पिढी यांच्यासोबत काम करताना त्यांनी आपल्या विचारांची खोली कमी होऊ दिली नाही तर, आध्यात्म हे जुनाट नाही, तर कालातीत आहे फक्त त्याची मांडणी काळानुसार बदलते हे दलाई लामा यांनी सिद्ध केलयं.
