लाईक्स, कमेंट्स अन् व्ह्यूजवर ठरतो Gen Z चा हॅप्पीनेस?, नव्या संशोधनातून मोठा खुलासा

GenZ Happiness सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर तुम्हीही वारंवार फोन उघडून "किती लाईक्स आले?" हे पाहता का? जर उत्तर 'हो' असेल, तर...

GenZ Happiness Depends On Social Media

GenZ Happiness Depends On Social Media

GenZ Happiness Depends On Social Media Like’s Comment’s Says Study : पोस्ट टाकली… पण लाईक्स कमी आले!”, “रिलला अपेक्षित व्ह्यूज मिळाले नाहीत!”, “कमेंट्स इतक्या कमी का?”… हे प्रश्न आजच्या Gen Z पिढीसाठी केवळ सोशल मीडियापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. उलट, त्यांचा थेट परिणाम त्यांच्या मूड, आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्यावर होत असल्याचा धक्कादायक खुलासा एका नव्या अभ्यासातून झाला आहे. पोस्टला अपेक्षेपेक्षा कमी लाईक्स किंवा कमेंट्स मिळाल्यास अनेक तरुणांचा मूड खराब होतो, तर हजारो फॉलोअर्स असूनही एकटेपणाची भावना कायम असल्याचे या अभ्यासात समोर आले आहे. हा स्टडी नेमका काय?, कुणी केला आणि त्यातून नेमकं काय वास्तव समोर आलं? त्याबद्दल समजून घेऊया…

कुणी केला स्टडी?

राजस्थानमधील कोटा येथील गव्हर्नमेंट आर्ट्स गर्ल्स कॉलेजच्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती सिडाना यांच्या नेतृत्वाखाली हा स्टडी करण्यात आला आहे. 25 दिवस चाललेल्या या संशोधनात विविध महाविद्यालयांतील 141 विद्यार्थिनींशी संवाद साधण्यात आला.  यात सोशल मीडियाचा तरुणांच्या भावना, नातेसंबंध आणि मानसिक आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो, याचा यात अभ्यास करण्यात आला.

लाईक्स-व्ह्यूजवर ठरतो मूड

स्टडीनुसार, 82.9 टक्के विद्यार्थिनींनी सांगितले की, त्यांच्या पोस्टवर मिळणारे लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज यांचा त्यांच्या मूडवर थेट परिणाम होतो. 9.8 टक्के विद्यार्थिनींनी काही प्रमाणात परिणाम होत असल्याचे सांगितले, तर केवळ 7.3 टक्के विद्यार्थिनींनी सोशल मीडियावरील प्रतिसादाचा आपल्या भावनांवर परिणाम होत नसल्याचे म्हटले.

संशोधकांच्या मते, अनेक तरुणांसाठी लाईक्स आणि व्ह्यूज हे आता केवळ आकडे राहिलेले नाहीत. ते स्वतःची ओळख, लोकप्रियता आणि समाजाकडून मिळणाऱ्या स्वीकाराचे मोजमाप बनले आहेत. त्यामुळे अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास अनेकांना स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण होते.

हजारो फॉलोअर्स… तरीही एकटेपणा

या स्टडीतील आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे 61 टक्के विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असूनही प्रत्यक्ष आयुष्यात एकटेपणा जाणवत असल्याचे सांगितले. ऑनलाइन मैत्रीपेक्षा प्रत्यक्ष भेटीतील नातेसंबंध अधिक मजबूत आणि भावनिक आधार देणारे असल्याचेही अनेकांनी नमूद केले.

नोटिफिकेशन आलं की हातात फोन

स्टडीनुसार, 48.2 टक्के विद्यार्थिनी नोटिफिकेशन येताच लगेच फोन तपासतात. तर, 43.9 टक्के विद्यार्थिनींनी मोबाईल वापरण्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याचे सांगितले. म्हणजेच त्या दिवसभर अनेक वेळा विनाकारण फोन पाहतात. याशिवाय 70 टक्के विद्यार्थिनींनी सोशल मीडियापासून काही काळ दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, प्रत्यक्षात ते करणं त्यांच्यासाठी कठीण असल्याचं त्यांनी मान्य केलं.

ट्रोलिंगमुळे वाढतो ताण

61 टक्के विद्यार्थिनींनी ट्रोलिंग किंवा नकारात्मक कमेंट्समुळे मानसिक तणाव किंवा दुःख होत असल्याचे सांगितले. 43.9 टक्के विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर दिखाव्याचे प्रमाण वाढल्याचे मत व्यक्त केले, तर 41.5 टक्के विद्यार्थिनींना त्याचा त्यांच्या खरी ओळख आणि व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असल्याचे वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

तज्ज्ञांचा सल्ला काय?

समोर आलेल्या या स्टडीतून सोशल मीडियाचा वापर पूर्णपणे बंद करण्याऐवजी ‘डिजिटल डिटॉक्स’ करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कुटुंबिय आणि मित्रांसोबत अधिक वेळ घालवणे, प्रत्यक्ष संवाद वाढवणे आणि स्वतःचा आनंद किंवा आत्मविश्वास लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्सवर अवलंबून ठेवू नये, असे संशोधकांनी म्हटले आहे.

संतुलन राखणे गरजेचे

Gen Z ही इंटरनेट आणि सोशल मीडियासोबतच वाढलेली पहिली पिढी मानली जाते. या माध्यमांमुळे त्यांना अनेक संधी मिळाल्या असल्या, तरी तुलना करण्याची प्रवृत्ती, एकटेपणा, मानसिक ताण आणि सोशल मीडियावरील वाढते अवलंबित्व ही गंभीर आव्हानेही त्यांच्यासमोर उभी राहिली आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना संतुलन राखणे आणि आभासी जगापेक्षा प्रत्यक्ष नात्यांना अधिक महत्त्व देणे, हीच आजच्या काळाची गरज असल्याचे या  स्टडीतून स्पष्ट होत आहे.

Exit mobile version