झटपट पैशाच्या नादात GenZ चा गेम ओव्हर; F&O मधील नुकसानाची धक्कादायक आकडेवारी

Gen Z's F&O losses F&O मार्केटमधील तरुणांच्या वाढत्या सहभागाचे आणि त्यांच्या तोट्याचे धक्कादायक चित्र समोर

Gen Z F&O Losses

Gen Z F&O Losses

Gen Z’s ‘Game Over’ in pursuit of quick money shocking figures on F&O losses : हातात स्मार्टफोन, स्क्रीनवर ट्रेडिंग अॅप आणि काही मिनिटांत हजारो रुपये कमावण्याचं स्वप्न… भारतातील तरुणाईचा एक मोठा वर्ग आता शेअर बाजाराकडे याच नजरेने पाहू लागला आहे. सोशल मीडियावर दिसणारे नफ्याचे स्क्रीनशॉट, ‘फिनफ्लुएन्सर्स’चे दावे आणि झटपट श्रीमंत होण्याची इच्छा यामुळे Gen Z चा F&O ट्रेडिंगकडे कल झपाट्याने वाढत आहे. मात्र, सेबीच्या ताज्या अभ्यासातून भारतीय इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजेच F&O मार्केटमधील तरुणांच्या वाढत्या सहभागाचे आणि त्यांच्या तोट्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानीला चाप! राज्य सरकारचा मोठा निर्णय…

सेबीच्या ताज्या अभ्यासानुसार, FY26 मध्ये 30 वर्षांखालील तब्बल 89 टक्के F&O ट्रेडर्सना नुकसान झाले आहे. म्हणजे बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक 10 तरुण ट्रेडर्सपैकी जवळपास 9 जणांच्या पदरी तोटा पडला. त्याच वेळी, F&O मार्केटमधील तरुणांचा सहभागही विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. FY22 मध्ये 30 वर्षांखालील ट्रेडर्सचा वाटा 31 टक्के होता जो FY26 मध्ये तो थेट 43 टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच, तरुण बाजारात मोठ्या संख्येने येत आहेत; पण त्याच वेगाने पैसा कमावत नाहीत उलट मोठ्या प्रमाणावर गमावत आहेत.

तरुण F&O कडे एवढे आकर्षित का होत आहेत?

यामागे केवळ शेअर बाजाराची आवड नाही, तर डिजिटल जगाचा मोठा प्रभाव आहे. स्मार्टफोनवर सहज उपलब्ध असलेले ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, सोशल मीडियावरील ट्रेडिंग कंटेंट, कमी भांडवलात मोठी पोझिशन घेण्याची क्षमता आणि अल्पावधीत मोठा नफा मिळवण्याची मानसिकता तरुणांना F&O कडे खेचत आहे.

विशेषतः Options ट्रेडिंगमध्ये नफा पटकन मिळू शकतो, अशी धारणा अनेक नव्या ट्रेडर्समध्ये असते. मात्र, त्याच वेगाने भांडवलही कमी होऊ शकते. सेबीच्या आकडेवारीतून याच जोखमीची तीव्रता स्पष्ट होते.

Options ट्रेडिंग ठरतेय सर्वात मोठा धोका

सेबीच्या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे Options ट्रेडिंगमधून होणारे नुकसान. FY26 मध्ये वैयक्तिक ट्रेडर्सच्या एकूण डेरिव्हेटिव्ह्ज नुकसानीपैकी तब्बल 92 टक्के नुकसान Options ट्रेडिंगशी संबंधित होते. सुमारे 87.7 टक्के वैयक्तिक Options ट्रेडर्सना नुकसान झाले, तर Futures ट्रेडर्समध्ये हे प्रमाण सुमारे 66 टक्के होते.

कमी भांडवल, पण कोट्यवधींचा टर्नओव्हर

सेबीच्या अभ्यासातील आणखी एक आकडेवारी तरुणांसह किरकोळ ट्रेडर्ससाठी विशेष चिंताजनक आहे. FY25-26 मध्ये सुमारे 95 लाख म्हणजेच 78 टक्के वैयक्तिक डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडर्सकडे 1 लाख रुपयांपेक्षा कमी इक्विटी पोर्टफोलिओ होता. मात्र, डेरिव्हेटिव्ह्ज टर्नओव्हरमध्ये त्यांचा वाटा 51 टक्के होता आणि एकूण नुकसानीत त्यांचा वाटा तब्बल 70 टक्के होता. याचा अर्थ स्पष्ट आहे की, भांडवल कमी असतानाही ट्रेडिंगचा आवाका मोठा ठेवला जात आहे आणि त्याची किंमत नुकसानाच्या रूपात मोजावी लागत आहे.

छोट्या शहरांमध्येही F&O ची क्रेझ

F&O ट्रेडिंगची ही लाट आता केवळ मुंबई, दिल्ली किंवा बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. FY26 मध्ये टॉप-30 शहरांबाहेरील म्हणजेच B30 भागातील गुंतवणूकदारांचा वाटा वैयक्तिक डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडर्समध्ये सुमारे दोन-तृतीयांश, तर डेरिव्हेटिव्ह्ज टर्नओव्हरमध्ये जवळपास अर्धा होता. यामुळे F&O ट्रेडिंग भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असल्याचे दिसते. मात्र, त्याच वेळी आर्थिक जोखीम समजून घेण्याची गरजही वाढली आहे.

‘ट्रेडिंग’ म्हणजे ‘गुंतवणूक’ नाही

सेबीची समोर आलेल्या आकडेवारीतून तरुणांसाठी सर्वात मोठा धडा म्हणजे F&O ट्रेडिंगला दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय समजणे धोकादायक ठरू शकते. डेरिव्हेटिव्ह्जमध्ये नफा मिळवण्याची संधी असली तरी त्यामध्ये जोखीमही मोठी असते.

सेबीने अहवालात वय, उत्पन्न, शहर, ट्रेडिंग अॅक्टिव्हिटी आणि पोर्टफोलिओचा आकार यांचा ट्रेडिंगच्या निकालांशी संबंध दाखवला आहे. मात्र, या संबंधांना थेट कारण-परिणामाचा पुरावा मानू नये, असेही स्पष्ट केले आहे. म्हणूनच तरुणांनी सोशल मीडिया किंवा इतरांच्या नफ्याचे व्हिडिओ पाहून F&O मध्ये उतरण्यापेक्षा जोखीम समजून घेणे, भांडवलाचे संरक्षण करणे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे ठरते.

तरुणांची बाजारातील वाढती भागीदारी ही चांगली गोष्ट आहे, मात्र आर्थिक साक्षरता आणि जोखीम व्यवस्थापन त्याच वेगाने वाढले नाही, तर हीच उत्सुकता मोठ्या नुकसानीत बदलू शकते हे मात्र नक्की.

 

Exit mobile version