‘मित्रों’ नव्हे, तर ‘फ्रेंड्स’, पोर्ट्रेट अँगल अन् सेल्फी कॅमेरा; PM मोदी 3 मिनिटांत खरचं Gen Z चे फेव्हरेट झाले?

PM Modi Video 23 जुलै, 2026 रोजी रात्री 11:52 वाजता... नीट पेपरफुटीविरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी देश करत होता. त्याच क्षणी...

  • Written By: Published:
PM Modi Video

PM Modi Video : नीट पेपरफुटीविरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी देश करत होता. त्याच क्षणी म्हणजेच 23 जुलै, 2026 रोजी रात्री 11:52 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ पोस्ट केला. पहिल्या नजरेत हा साधा व्हिडिओ वाटतो. पण त्याची भाषा, शूटिंगची पद्धत, वेळ आणि मांडणी यामुळे तो चर्चेचा विषय ठरला. 2 मिनिटे 55 सेकंदांच्या या व्हिडिओसाठी स्टुडिओ सेटअपची किंवा व्यावसायिक कॅमेरा नव्हती. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मोबाईल फोनचा सेल्फी कॅमेरा वापरला आणि अगदी इन्स्टाग्राम रीलप्रमाणे पोर्ट्रेट मोडमध्ये हा व्हिडिओ शूट केला. अशा वेगळ्या प्रकारच्या व्हिडिओद्वारे मोदींनी खरचं ‘GenZ’ चे मतपरिवर्तन केले आहे का? आणि 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मोदी Gen Z चे फेव्हरेट झाले का? त्याबद्दल जाणून घेऊया… जर तुम्ही अजून व्हिडिओ पाहिला नसेल, तर तो आधी बघा…

‘मित्रो’ऐवजी ‘फ्रेंड्स’… योगायोग की रणनीती?

पंतप्रधान मोदींनी आपल्या कारकिर्दीत हजारो भाषणे दिली आहेत. प्रत्येक वेळी त्यांनी एकतर ‘मेरे प्यारे देशवासियों’ किंवा “मित्रो” असे म्हटले आहे. मात्र, गुरूवारी (दि.23) रात्रीच्या व्हिडिओमध्ये मोदींनी व्हिडिओची सुरुवात “फ्रेंड्स” या संबोधनाने केली. संवादतज्ज्ञांच्या मते, हा शब्दप्रयोग विशेष लक्षवेधी आहे. कारण सोशल मीडिया, रील्स आणि डिजिटल संवादात “फ्रेंड्स” हा शब्द अधिक सहज वापरला जातो. Gen Z पिढी हिंदी-इंग्रजी मिश्र भाषेत संवाद साधण्याची सवय असल्याने हा बदल जाणीवपूर्वक असू शकतो, असे काही तज्ज्ञ मानतात.

स्टुडिओ नाही… मोबाईलचा सेल्फी कॅमेरा

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ असो वा राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण, त्यांचे व्हिडिओ संदेश नेहमीच व्यावसायिक कॅमेरा सेटअप वापरून चित्रित केले जातात. या व्हिडिओतील सर्वात मोठा बदल म्हणजे त्याचे चित्रिकरण. यापूर्वीचे बहुतांश सरकारी संदेश व्यावसायिक कॅमेरा, ठरावीक पार्श्वभूमी, राष्ट्रीय ध्वज आणि नियंत्रित प्रकाशयोजनेसह चित्रित केले जात होते. यावेळी मात्र चित्र वेगळे होते. म्हणजे मोठा कॅमेरा नव्हता, तर होता एक साधा मोबाईल फोन. पोर्ट्रेट (Vertical) फॉरमॅट, रील्ससारखी फ्रेमिंग, साधी पार्श्वभूमी आणि नैसर्गिक प्रकाश हीच शैली आज सोशल मीडियावरील बहुतांश कंटेंटमध्ये दिसते. म्हणूनच काही तज्ज्ञांच्या मते, व्यावसायिकतेपेक्षा “वैयक्तिक संवाद” निर्माण करण्याचा प्रयत्न या व्हिडिओत दिसतो. ज्याप्रमाणे GenZ ने आंदोलनांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया रणनीतीचा त्यांच्याच विरोधात शस्त्र म्हणून वापर केला, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींनी या व्हिडिओद्वारे तेच शस्त्र उचलले.

रात्रीस खेळ चाले! बैठक, पत्नीला फोन, रुग्णालयात मंत्री; अशी संपली वांगचुक यांच्या उपोषणाची लढाई

रात्री 11:52 ची वेळही ठरली चर्चेचा विषय 

मोदींची व्हिडिओ पोस्ट करण्याची वेळही महत्त्वाची मानली जात आहे. 23 जुलै रोजी रात्री 11:52 वाजता हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज (दि.24) दुपारी सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बैठक होणार आहे. यामुळे काही राजकीय विश्लेषकांच्या मते, चर्चा सुरू होण्यापूर्वीच सरकारने आपली भूमिका आणि पुढील कृती सार्वजनिक करण्याचा प्रयत्न केला. मोदींनी CJP च्या बैठकीच्या जवळपास 12 तास आधी हा व्हिडिओ प्रसिद्ध केला. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, सरकारला चर्चेपूर्वीच आपला अजेंडा निश्चित करायचा होता.

या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले की, 24 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि पेपरफुटीविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी जलदगती न्यायालयांच्या स्थापनेची घोषणा केली आणि सांगितले की, पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात एक नवीन विधेयक सादर केले जाईल.

लहान व्हिडिओ… साधी भाषा

तुम्ही व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास, तुम्हाला आणखी काही सूक्ष्म तपशील दिसतात. हा व्हिडिओ एखाद्या अधिकृत ठिकाणी नव्हे, तर एका सामान्य खोलीत चित्रित केलेला आहे. मोठे झेंडे नाहीत, पुस्तकांची कपाटे नाहीत. ही अगदी तशीच पार्श्वभूमी आहे जशी कोणत्याही सामान्य माणसाच्या घरात असते तशी. याशिवाय कोणतेही अवघड किंवा कायदेशीर शब्द नाहीत. संवादाची शैली अतिशय साधी आहे आणि व्हिडिओची लांबी अवघी 2 मिनिटे 55 सेकंद. डिजिटल प्लॅटफॉर्मवर लहान आणि थेट संदेश अधिक प्रभावी ठरतात, हे लक्षात घेऊन हा फॉरमॅट निवडला असावा, असे निरीक्षकांचे मत आहे.

मोदींची घोषणा अन् ‘तारीख पे तारीख’ची चर्चा….फास्ट ट्रॅक कोर्टात काय होणार?

मोदींचा हा प्रयोग यशस्वी ठरेल का?

GenZ जनरेशनला डोळ्यासमोर ठेऊन शूट केलेल्या मोदींच्या या व्हिडिओवर अनेक मतमतांतरे आहेत. पंतप्रधान मोदी यांनी प्रथमच Gen Z च्या डिजिटल भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बदलत्या सोशल मीडिया संस्कृतीशी जुळवून घेण्याचा हा प्रयत्न भविष्यातील राजकीय संवादासाठी महत्त्वाचा ठरू शकेल असे काहींचे मत आहे. तर, मोदींनी केलेला हा प्रयत्न उशिरा झाला आहे. आंदोलन आधीच रस्त्यावर पोहोचले आहे आणि केवळ एका व्हिडिओमुळे जनमतात मोठा बदल होईल, असे म्हणणे घाईचे ठरेल असे काहींचे म्हणणे आहे.

खरा प्रश्न मात्र पुढेच…

मोदींनी मोबाईलवर शूट केलेला व्हिडिओमध्ये युवकांना दिलली ‘फ्रेंड्स’ अशी हाक, रील्ससारखा फॉरमॅट आणि कमी वेळेत दिलेला संदेश… या सगळ्यामुळे हा व्हिडिओ निश्चितच चर्चेत आला आहे. मात्र, हा केवळ संवादशैलीतील बदल ठरेल की त्याचा प्रत्यक्ष जनमतावर परिणाम होईल? याचे उत्तर येत्या काही दिवसांतील घडामोडींमध्येच मिळेल.

टीप : वरील विश्लेषण हे व्हिडिओच्या सादरीकरण, संवादशैली यांच्या निरीक्षणांवर आधारित आहे. लेट्सअप मराठी मोदींनी GenZ जनरेशनला आकर्षित करण्यासाठीच अशा प्रकारचा व्हिडिओ बनवला असा दावा करत नाही.  

 

follow us