Gold Loan : 4 वर्षांत तब्बल 208% वाढ! भारतीयांनी सोनं गहाण ठेवून किती हजार कोटी घेतले?

Gold Loan मार्च 2022 मध्ये NBFCs कडे असलेले गोल्ड लोन 1.19 लाख कोटी होते. मार्च 2026 पर्यंत ही रक्कम तब्बल 3.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचली

Gold Loan Demand

Gold Loan Demand

Gold Loan Demand Surges India Know Parliament Data : घरात ठेवलेले सोन्याचे दागिने केवळ संपत्ती म्हणून न पाहता, गरजेच्या वेळी आर्थिक मदतीचा आधार म्हणून वापरण्याचा ट्रेंड देशात झपाट्याने वाढत आहे. गेल्या चार वर्षांत गोल्ड लोनच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. विशेष म्हणजे, मार्च 2022 ते मार्च 2026 या कालावधीत NBFCs कडील गोल्ड लोनमध्ये तब्बल 208 टक्क्यांची वाढ झाली आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये NBFCs कडे असलेले गोल्ड लोन 1.19 लाख कोटी रुपये होते. मार्च 2026 पर्यंत ही रक्कम तब्बल 3.66 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. म्हणजेच अवघ्या चार वर्षांत गोल्ड लोनचा हा आकडा जवळपास तिप्पट झाला आहे.

बँकांमध्येही गोल्ड लोनची मागणी वाढली

गोल्ड लोनची वाढ केवळ NBFCs पुरती मर्यादित राहिलेली नाही. अनुसूचित व्यावसायिक बँकांमध्येही सोन्याच्या बदल्यात कर्ज घेण्याचे प्रमाण मोठ्या वेगाने वाढले आहे. मार्च 2023 मध्ये अनुसूचित बँकांकडील बकाया गोल्ड लोन 6.15 लाख कोटी रुपये होते. मार्च 2026 मध्ये ही रक्कम वाढून 14.63 लाख कोटी रुपये झाली. म्हणजेच अवघ्या तीन वर्षांत या कर्जात सुमारे 138 टक्क्यांची वाढ झाली आहे. यावरून सोने तारण ठेवून कर्ज घेणे आता केवळ छोट्या गरजांसाठी किंवा ग्रामीण भागापुरते मर्यादित राहिलेले नसून, सर्वसामान्य ग्राहक, छोटे व्यावसायिक आणि MSME क्षेत्रासाठीही ते कर्जाचा महत्त्वाचा पर्याय बनत असल्याचे चित्र आहे.

सोन्याच्या वाढत्या किमतींचाही फायदा

गोल्ड लोनच्या वाढत्या मागणीमागे सोन्याच्या किमतीतील तेजी हेही एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. सोन्याचे बाजारमूल्य वाढल्याने त्याच दागिन्यांच्या तारणावर ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक कर्ज मिळण्याची शक्यता निर्माण होते. याशिवाय, गोल्ड लोनची प्रक्रिया तुलनेने जलद असते आणि त्यासाठी मालमत्ता किंवा इतर मोठ्या तारणाची गरज नसते. त्यामुळे अचानक आर्थिक गरज निर्माण झाल्यास अनेक ग्राहकांसाठी हा सोपा पर्याय ठरत आहे.

ग्रामीण भाग आणि छोट्या व्यवसायांना मोठा आधार

सरकारच्या मते, गोल्ड लोनमुळे ग्रामीण भागातील नागरिक, छोटे-मोठे उद्योजक आणि MSME क्षेत्राला औपचारिक कर्जव्यवस्थेतून निधी मिळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे पूर्वी जास्त व्याजदराने कर्ज देणाऱ्या अनौपचारिक सावकारांवरील अवलंबित्व कमी होण्यासही हातभार लागला आहे.

कर्ज वाढले, पण डिफॉल्टचे प्रमाण घटले

गोल्ड लोनमध्ये एवढी मोठी वाढ झाली असतानाही कर्जफेडीच्या बाबतीत दिलासादायक चित्र दिसत आहे. बँकांमधील गोल्ड लोनचे GNPA प्रमाण मार्च 2023 मधील 0.19 टक्क्यांवरून मार्च 2026 मध्ये 0.12 टक्क्यांवर आले. NBFCs मध्येही अशीच सुधारणा झाली आहे. मार्च 2023 मध्ये 2.32 टक्के असलेले GNPA प्रमाण मार्च 2026 मध्ये घटून 0.81 टक्के झाले आहे. म्हणजेच गोल्ड लोनचा व्यवसाय मोठ्या वेगाने वाढत असताना कर्ज थकवण्याचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.

RBI चे नियमही झाले कडक

गोल्ड लोनच्या वाढत्या बाजाराच्या पार्श्वभूमीवर RBI ने जून 2025 पासून नवीन नियम लागू केले आहेत. यामध्ये सोन्याचे मूल्यांकन, Loan-to-Value (LTV) प्रमाण आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण यासंबंधी नियम अधिक स्पष्ट आणि कठोर करण्यात आले आहेत. सरकारने असेही स्पष्ट केले आहे की, सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकाचे कर्ज थकल्यास सोने लिलाव करण्यापूर्वी नोटीस देणे, योग्य Reserve Price निश्चित करणे आणि लिलाव प्रक्रिया पारदर्शक ठेवणे बँका आणि NBFCs साठी आवश्यक आहे.

सोन्याच्या वाढत्या किमती, तुलनेने सोपी कर्जप्रक्रिया आणि औपचारिक कर्जव्यवस्थेचा वाढता विस्तार यामुळे देशात गोल्ड लोनचा बाजार वेगाने विस्तारत आहे. विशेष म्हणजे कर्जाचे प्रमाण वाढूनही डिफॉल्टचे प्रमाण घटल्याने या क्षेत्राची स्थिती सध्या तुलनेने मजबूत असल्याचे चित्र सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.

Exit mobile version