रात्री वाहन चालवताना समोरून येणाऱ्या गाडीचा (Trucks) प्रखर हायबीम डोळ्यांवर पडला की काही क्षणांसाठी रस्ताच दिसेनासा होतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा अनुभव धोकादायक ठरू शकतो. आता अशाच प्रखर हेडलाइटच्या त्रासाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार वाहनांच्या प्रकाशव्यवस्थेबाबत नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. नवीन बाईक-स्कूटरच्या ऑटोमॅटिक हेडलाइटपासून हायबीमची तीव्रता, हेडलाइटचा रंग आणि बस-ट्रकच्या रिफ्लेक्टिव्ह टेपपर्यंत अनेक बदल प्रस्तावित आहेत. नेमके काय बदल होणार? त्याबद्दल जाणून घेऊया…
नेमकं काय बदलणार?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Central Motor Vehicles Rules मध्ये बदल करण्याचा मसुदा प्रस्तावित केला आहे. यामध्ये नवीन दुचाकींच्या ऑटोमॅटिक हेडलॅम्पबाबत महत्त्वाचा बदल सुचवण्यात आला आहे. तसेच बस आणि अवजड वाहनांवर असलेल्या रिफ्लेक्टिव्ह टेपच्या गुणवत्तेबाबतही कडक नियम प्रस्तावित आहेत.
दुचाकीस्वारांसाठी काय बदलणार?
सध्या अनेक दुचाकींमध्ये Automatic Headlamp On (AHO) सिस्टीम असते. मात्र, प्रस्तावित नियमांनुसार नवीन दुचाकींमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प सुरू झाल्यावर तो फक्त लो-बीमवरच कार्यरत राहण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामागचा मुख्य उद्देश समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यांवर थेट प्रखर प्रकाश पडू नये आणि त्यामुळे होणारा ग्लेअर कमी करणे हा आहे. हा नियम फक्त नवीन बाईक आणि स्कूटरवर लागू होईल. रस्त्यावर आधीपासून धावत असलेल्या वाहनांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
हायबीमही होणार ‘कंट्रोल’
केवळ दुचाकीच नाही, तर सर्व वाहनांमधील अत्यधिक तीव्रतेच्या हेडलॅम्पवरही नियंत्रण आणण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावानुसार दुचाकींच्या हेडलॅम्पची कमाल अनुमत तीव्रता 1.5 लाख कँडेला वरून 1 लाख कँडेला, तर कारसाठी ही मर्यादा 2.25 लाखांवरून 1.5 लाख कँडेला करण्याचा प्रस्तावित आहे. हे बदल विशेषतः रात्री समोरून येणाऱ्या वाहनांमुळे होणारा डोळ्यांवरील ताण आणि काही क्षणांची दृष्टी कमी होण्याचा धोका कमी करण्यासाठी करण्यात येत आहेत.
पांढऱ्या प्रखर प्रकाशावरही येणार मर्यादा
नवीन प्रस्तावात हेडलॅम्पच्या कलर टेम्परेचरची मर्यादा 6,500 Kelvin ठेवण्याची तरतूद ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जास्त कलर टेम्परेचर असलेल्या पांढऱ्या प्रकाशामुळे समोरच्या चालकांना अधिक ग्लेअर जाणवू शकतो, त्यामुळे त्यावरही नियंत्रण आणण्याचा प्रयत्न विचाराधीन आहे.
*शहरात हायबीम लावल्यास मिळणार अलर्ट?*
प्रस्तावातील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे शहरांमध्ये हायबीम वापरल्यास चालकाला ऑडिओ अलर्ट देणारी यंत्रणा. नवीन कार आणि बाईकमध्ये अशी व्यवस्था असू शकते, जी शहरात हायबीम सुरू केल्यास चालकाला लो-बीम वापरण्याची आठवण करून देईल. मात्र, हा अलर्ट वाहनाच्या वेगानुसार काम करण्याचा प्रस्ताव आहे. 60 किमी प्रतितासपेक्षा जास्त वेगाने महामार्गावर वाहन चालवत असताना हा इशारा दिला जाणार नाही, कारण अंधाऱ्या महामार्गांवर काही परिस्थितीत हायबीमची आवश्यकता असू शकते.
बस आणि ट्रकचालकांसाठीही महत्त्वाचा बदल
रात्री महामार्गावर किंवा पावसासारख्या खराब हवामानात मोठ्या वाहनांचा मागील भाग दिसणे अनेकदा कठीण होते. यासाठी बस आणि इतर अवजड वाहनांवर असलेल्या रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह टेप किंवा मार्किंगने ठराविक गुणवत्ता मानके पूर्ण करणे प्रस्तावित आहे. अशा टेपवर दुसऱ्या वाहनाचा प्रकाश पडला की, ती परावर्तित होते आणि दूरवरूनही वाहनाची उपस्थिती लक्षात येण्यास मदत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी मागून येणाऱ्या वाहनांना बस किंवा ट्रक वेळेत दिसण्यास मदत होऊ शकते.
*चालकांसाठी फायदा काय?*
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या प्रस्तावित बदलांचा थेट फायदा रस्त्यावर वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला होणार आहे. या बदलामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर हेडलाइटमुळे दुचाकीस्वारांच्या डोळ्यांवर होणारा ग्लेअर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, कार चालकांसाठी अत्यधिक तीव्र हेडलाइटवर मर्यादा आल्याने रात्रीच्या वेळी समोरचा रस्ता पाहताना होणारा त्रास कमी होऊ शकतो. तर, रिफ्लेक्टिव्ह मार्किंगमुळे ट्रक आणि बसचालकांसाठी मागून किंवा बाजूने येणाऱ्या वाहनांना मोठे वाहन अधिक स्पष्टपणे दिसण्यास मदत होऊ शकते.
नियम कधीपासून लागू होणार?
सध्या हे बदल प्रस्तावित मसुद्याचा भाग आहेत. सरकारने या नियमांवर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. मसुद्यानुसार काही महत्त्वाच्या तरतुदी 1 एप्रिल 2027 पासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे वाहनचालकांनी सध्या आपल्या वाहनाच्या नियमांमध्ये तातडीने कोणताही बदल करण्याची गरज नाहीये. पण, नवीन नियम आले किंवा नाही आले, समोरून वाहन येत असताना हायबीमऐवजी लो-बीमचा वापर करणे, पावसात आणि धुक्यात वेग कमी ठेवणे, सुरक्षित अंतर राखणे आणि अवजड वाहनांपासून पुरेसे अंतर ठेवणे हेच सुरक्षित ड्रायव्हिंगचे महत्त्वाचे नियम आहेत. कारण रस्त्यावर तुमचा हेडलाइट फक्त तुम्हाला रस्ता दाखवत नाही; समोरच्या चालकाच्या डोळ्यांनाही तो प्रभावित करतो. त्यामुळे ‘माझा रस्ता दिसला पाहिजे’इतकंच ‘समोरच्यालाही रस्ता दिसला पाहिजे’ हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
