Personal Loan : अचानक पैशांची गरज भासल्यास अनेकजण पर्सनल लोनचा (Personal Loan) पर्याय निवडतात. वैद्यकीय खर्च, मुलांचे शिक्षण, घरातील महत्त्वाची कामे किंवा इतर आर्थिक गरजांसाठी पर्सनल लोन उपयोगी ठरू शकते. विशेष म्हणजे या कर्जासाठी बँकेकडे घर, जमीन किंवा सोने यांसारखी मालमत्ता गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते. मात्र, या सुविधेच्या बदल्यात बँका व्याजदर आणि विविध शुल्क आकारतात. त्यामुळे पर्सनल लोन घेण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची आणि अटींची तुलना करणे महत्त्वाचे आहे.
सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि IDFC First Bank या बँका पर्सनल लोन देतात. मात्र, या तिन्ही बँकांचे व्याजदर, प्रोसेसिंग फी आणि कर्ज परतफेडीचा कालावधी वेगवेगळा आहे. त्यामुळे कोणत्या बँकेतून कर्ज घेणे तुमच्या खिशाला परवडणारे ठरू शकते, हे जाणून घेऊया.
IDFC First Bank मध्ये किती आहे व्याजदर?
IDFC First Bank मध्ये पर्सनल लोनचा सुरुवातीचा व्याजदर वार्षिक 9.99 टक्के आहे. या बँकेचे वैशिष्ट्य म्हणजे पर्सनल लोनवर प्रोसेसिंग फी आणि फोरक्लोजर चार्ज आकारला जात नाही. या बँकेकडून ग्राहकांना 50 हजार रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत पर्सनल लोन मिळू शकते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 9 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंतचा कालावधी दिला जातो.
5 लाखांच्या कर्जावर किती EMI?
समजा, तुम्ही IDFC First Bank कडून 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले, तर तुम्हाला दरमहा 10,621 रुपये EMI भरावा लागेल. या पाच वर्षांच्या कालावधीत तुम्हाला व्याजापोटी 1 लाख 37 हजार 260 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच मुद्दल आणि व्याज मिळून एकूण 6 लाख 37 हजार 260 रुपयांची परतफेड करावी लागेल.
Paschim Banga : पश्चिम बंगालचे नाव बदलणार; 9 डिसेंबरला विधानसभेत प्रस्ताव; जाणून घ्या नवीन नाव
SBI मध्ये पर्सनल लोनचा व्याजदर किती?
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडूनही ग्राहकांना पर्सनल लोनची सुविधा दिली जाते. उपलब्ध माहितीनुसार SBI मध्ये पर्सनल लोनचा सुरुवातीचा व्याजदर वार्षिक 10 टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र, ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि आर्थिक पात्रता यानुसार प्रत्यक्ष व्याजदरात बदल होऊ शकतो. SBI कडून एक लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन दिले जाते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 6 महिन्यांपासून ते 84 महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळतो. पण SBI कडून पर्सनल लोन घेताना 1.50 टक्के प्रोसेसिंग फी भरावी लागते. त्यावर जीएसटीदेखील स्वतंत्रपणे आकारला जातो. त्यामुळे कर्ज घेताना केवळ व्याजदर न पाहता प्रोसेसिंग फीचाही विचार करणे आवश्यक आहे.
PNB मध्ये किती भरावी लागेल EMI?
पंजाब नॅशनल बँक म्हणजेच PNB मध्ये पर्सनल लोनचा सुरुवातीचा व्याजदर वार्षिक 10.50 टक्क्यांच्या आसपास आहे. या बँकेकडून कर्ज घेताना 1 टक्का प्रोसेसिंग फी भरावी लागते. याशिवाय डॉक्युमेंटेशन शुल्कही आकारले जाऊ शकते. 5 लाखांच्या कर्जासाठी किती EMI?
समजा, तुम्ही PNB कडून 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले, तर तुम्हाला दरमहा 10,746.95 रुपये EMI भरावा लागेल.
SBI, PNB की IDFC First Bank; कोणती बँक फायदेशीर?
तिन्ही बँकांच्या सुरुवातीच्या व्याजदरांची तुलना केली, तर IDFC First Bank सर्वात कमी म्हणजे 9.99 टक्के व्याजदराने पर्सनल लोन देत असल्याचे दिसते. त्यानंतर SBI चा सुमारे 10 टक्के आणि PNB चा सुमारे 10.50 टक्के सुरुवातीचा व्याजदर आहे. मात्र, केवळ सुरुवातीचा व्याजदर पाहून कर्जासाठी बँकेची निवड करणे योग्य ठरणार नाही. कारण प्रत्येक ग्राहकाला मिळणारा प्रत्यक्ष व्याजदर त्याच्या उत्पन्नावर, क्रेडिट स्कोअरवर आणि कर्ज पात्रतेवर अवलंबून असतो.
