फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना पाच चुका टाळा, अन्यथा व्याजातून होणारी कमाई घटेल ?
FD Calculator: FD मध्ये पैसे गुंतवताना 5 चुका टाळा. बँकांचे व्याजदर, FD Laddering, टॅक्स आणि मॅच्युरिटी रिन्यूअलच्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
Fixed Deposit : फिक्स्ड डिपॉझिट (FD) म्हणजेत मुदत ठेवी हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक लोकप्रिय पर्याय आहे. ज्येष्ठ नागरिक हे सुरक्षित पर्याय निवडतात. मात्र मुदत ठेवी (FD) करताना काही छोट्या चुका झाल्यास व्याजातून मिळणाऱ्या कमाईवर फटका बसू शकतो. बँकांच्या व्याजदरांची तुलना न करणे, संपूर्ण रक्कम एकाच एफडीमध्ये ठेवणे किंवा मॅच्युरिटीनंतर कोणतीही तपासणी न करता एफडी रिन्यू करणे अशा चुका टाळणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या, FD करताना कोणत्या पाच चुका टाळल्या पाहिजेत.
1) बँकांच्या व्याजदरांची तुलना न करता FD करणे
अनेकजण आपल्या जुन्या बँकेतच FD करतात. मात्र, इतर बँकांमध्ये किती व्याजदर मिळत आहे, याची तुलना करत नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीतून कमी परतावा मिळण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, तुम्हाला 5 लाख रुपयांची तीन वर्षांसाठी FD करायची आहे. एका बँकेत 6.5 टक्के, तर दुसऱ्या बँकेत 7.5 टक्के व्याजदर मिळत आहे. वार्षिक चक्रवाढ व्याजानुसार तीन वर्षांनंतर पहिल्या FD ची रक्कम सुमारे 6.04 लाख रुपये, तर दुसऱ्या FD ची रक्कम सुमारे 6.22 लाख रुपये होऊ शकते. म्हणजेच जवळपास 18 हजार रुपयांचा फरक पडू शकतो. त्यामुळे FD करण्यापूर्वी वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर तपासणे आवश्यक आहे.
2) संपूर्ण रक्कम एकाच FD मध्ये गुंतवणे
समजा, तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि तुम्ही संपूर्ण रक्कम पाच वर्षांसाठी एकाच FD मध्ये गुंतवली. मात्र, दोन वर्षांनंतर अचानक 3 लाख रुपयांची गरज निर्माण झाली, तर तुम्हाला FD मुदतीपूर्वी मोडावी लागू शकते. अशा वेळी बँकेकडून दंड आकारला जाऊ शकतो किंवा व्याजदरात कपात होऊ शकते. यासाठी FD Laddering हा पर्याय उपयोगी ठरू शकतो. यामध्ये संपूर्ण रक्कम एकाच FD मध्ये ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या कालावधीच्या FD मध्ये विभागली जाते. उदाहरणार्थ, 10 लाख रुपयांच्या पाच FD करून प्रत्येकी 2 लाख रुपये वेगवेगळ्या मुदतीसाठी गुंतवता येतात. त्यामुळे पैशांची गरज भासल्यास संपूर्ण गुंतवणूक मोडण्याची वेळ येत नाही.
3) व्याज मिळवण्याचा चुकीचा पर्याय निवडणे
FD मध्ये व्याज मिळवण्याचे प्रामुख्याने दोन पर्याय असतात. पहिला म्हणजे दरमहा किंवा तिमाही व्याज मिळवणे आणि दुसरा म्हणजे व्याज मूळ रकमेत जोडून पुन्हा गुंतवणे. याला क्युम्युलेटिव्ह FD असे म्हणतात. तुम्हाला नियमित उत्पन्न हवे असल्यास मासिक तिमाही व्याजाचा पर्याय निवडता येतो. मात्र तातडीने पैशांची गरज नसेल आणि गुंतवणुकीतून अधिक रक्कम मिळवायची असेल, तर क्युम्युलेटिव्ह FD चा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये व्याजाची पुनर्गुंतवणूक होत असल्याने चक्रवाढीचा फायदा मिळतो.
4) FD वरील व्याजाच्या कराकडे दुर्लक्ष करणे
FD मधून मिळणारे व्याज तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते. त्यावर तुमच्या आयकर स्लॅबनुसार कर लागू होतो. उदाहरणार्थ, तुम्हाला एका वर्षात FD मधून 50 हजार रुपये व्याज मिळाले आणि तुम्ही 30 टक्के आयकर स्लॅबमध्ये असाल, तर साधारण 15 हजार रुपये कर लागू होऊ शकतो. म्हणजेच करानंतर तुमच्या हातात अंदाजे 35 हजार रुपये राहतील. त्यामुळे FD करताना केवळ व्याजदर पाहू नका, तर कर भरल्यानंतर प्रत्यक्ष किती परतावा मिळणार आहे, याचाही विचार करा. TDS कपात झाली म्हणजे तुमचा अंतिम कर भरला गेला असे नाही.
5) मॅच्युरिटीनंतर तपासणी न करता FD रिन्यू करणे
अनेक बँकांमध्ये FD मॅच्युरिटी झाल्यानंतर ऑटो रिन्यूअलची सुविधा असते. त्यामुळे FD आपोआप पुन्हा गुंतवली जाते. मात्र, नवीन व्याजदर तपासल्याशिवाय FD रिन्यू केल्यास कमी परतावा मिळू शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही तीन वर्षांपूर्वी 7.5 टक्के व्याजदराने FD केली होती. आता मॅच्युरिटीच्या वेळी बँक 6.5 टक्के व्याज देत असेल, तर जुन्याच बँकेत FD रिन्यू केल्यामुळे पुढील तीन वर्षांत कमी कमाई होऊ शकते. त्यामुळे FD मॅच्युअर होण्यापूर्वी नवीन व्याजदर तपासा आणि वेगवेगळ्या बँकांच्या ऑफर्सची तुलना करून योग्य निर्णय घ्या.
FD करताना या महत्त्वाच्या गोष्टीही लक्षात ठेवा
FD ला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानले जात असले, तरी बँकेतील ठेवींना मर्यादित विमा संरक्षण मिळते. DICGC अंतर्गत प्रत्येक ठेवीदाराला प्रत्येक बँकेत जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. यामध्ये मूळ रक्कम आणि व्याजाचा समावेश असतो. एकाच बँकेतील सर्व पात्र ठेवी एकत्रित करून ही मर्यादा लागू होते. त्यामुळे मोठी रक्कम FD मध्ये गुंतवताना बँकेची आर्थिक स्थिती, जमा विम्याची मर्यादा, व्याजदर, मुदतपूर्व पैसे काढण्याचे नियम आणि कर यांची माहिती घेणे आवश्यक आहे.
थोडक्यात सांगायचे तर, FD मधून चांगली कमाई करण्यासाठी योग्य व्याजदर निवडणे, गुंतवणुकीचे नियोजन करणे आणि कराचा विचार करणे महत्त्वाचे आहे. या 5 चुका टाळल्यास तुमच्या बचतीतून अधिक चांगला परतावा मिळवण्यास मदत होऊ शकते.