Healthy Habits For Women : आजच्या धावपळीच्या जीवनात, महिला अनेकदा घर, कुटुंब आणि काम यांच्यात अडकलेल्या दिसतात. वेळेचा अभाव, जबाबदाऱ्यांचा सततचा दबाव आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्तीमुळे हळूहळू अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. मात्र, जर तुम्हाला ठणठणित रहायचे असेल तर, 4 सवयी अंगिकारल्याच पाहिजे. अभिनेत्री समांथा रूथ प्रभूसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये न्यूट्रिशनिस्ट राषि चौधरी यांनी या सवयींबद्दल माहिती दिली आहे.
राषि चौधरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्टाग्रॅमवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी महिलांना चार आवश्यक सवयी अंगीकारण्याचा सल्ला दिला असून, या सवयी नियमितपणे जीवनशैलीत समाविष्ट केल्यास, आरोग्य आणि दैनंदिन समस्यांपासून 70 टक्के आराम मिळू शकतो असे चौधरी यांनी सांगितले आहे.
1. रक्तातील साखर नियंत्रणासाठी, हेल्थी फॅट घ्या
न्यूट्रिशनिस्ट चौधरी यांच्या मते, जेवणाची सुरूवात जर, हेल्दी फॅटने केली तर, रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढण्यापासून रोखले जाते. जेव्हा महिला प्रथम कार्बोहायड्रेट किंवा गोड पदार्थ खातात तेव्हा ते इन्सुलिनमध्ये वाढ करतात, ज्यामुळे थकवा, चिडचिड आणि लवकर भूक लागते. त्यामुळे जेवणापूर्वी किंवा जेवणाच्या सुरुवातीला थोडेसे तूप, नट्स किंवा दह्याचा समावेश केल्यास रक्तातील साखर स्थिर होण्यास आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते.
2. दैनंदिन गरजेनुसार प्रोटिन सेवन करा
प्रोटिनच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये अशक्तपणा, स्नायू गळून जाणे, केस गळणे आणि हार्मोनल समस्या प्रामुख्याने जाणवतात. ही समस्या टाळण्यासाठी प्रत्येक वेळच्या जेवणात पुरेशा प्रोटिनचा समावेळ करणे फायदेशीर ठरू शकते. डाळी, अंडी, चीज, दही, टोफू आणि काजू यांसारखे पदार्थ शरीर हेल्दी ठेवतात आणि पोट जास्त काळ भरलेले ठेवतात. ज्यामुळे सारखं-सारखं खाण्याची इच्छा कमी होते.
3. कार्बोहायड्रेट्सपेक्षा फायबरवर केंद्रीत करा लक्ष
डाएटमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स आणि कमी फायबर असलेल्या आहारामुळे वजन वाढू शकते आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे महिलांनी त्यांच्या आहारात फायबर आणि कार्बोहायड्रेट्सचे योग्य संतुलन राखण्याचा सल्ला राषि यांनी दिला आहे. यासाठी महिलांनी साबूत धान्य, भाज्या, फळांचे सेवन करावे. यामुळे केवळ पचन सुधारत नाही तर, रक्तातील साखर नियंत्रित राहते तसेच पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते.
4. रात्रीचे जेवण लवकर आणि हलके असावे
रात्री उशिरा जेवल्याने पचनसंस्था कमकुवत होते आणि वजन वाढते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी महिलांनी झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचे जेवण करावे. लवकर जेवण केल्याने झोप सुधारते, हार्मोन्स संतुलित होतात आणि सकाळी पोट साफ होते.
डिस्क्लेमर : सदर बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओवर आधारित आहे. आहार आणि आरोग्याविषयी कोणतीही नवी गोष्ट सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
