Reels : फक्त अजून एक रील… वाढत्या स्क्रोलिंगमुळे मेंदूत होतोय ‘डिजिटल एम्नेशिया’चा लोचा
Reel Scrolling Impact On Brain गुगलवरची माहिती लगेच उपलब्ध असल्याने मेंदूने स्वतः लक्षात ठेवण्याचे कष्ट घेणे सोडून दिले आहे.
Reel Scrolling Impact On Brain : आजकाल बसमध्ये, ट्रेनमध्ये, ऑफिसच्या ब्रेकमध्ये किंवा अगदी झोपण्यापूर्वीही अनेकांच्या हातात मोबाईल आणि स्क्रीनवर रील्स दिसतात. फक्त दोन मिनिटं म्हणून सुरू झालेलं रील स्क्रोलिंग कधी अर्धा-पाऊण तास, तर कधी तासन् तास चालतं. पण हेच रील्सचं वेड आता मेंदूवर परिणाम करत असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. तासनतास मोबाईलच्या स्क्रीनवर रील स्क्रोल करण्याची ही सवय तुम्हाला ‘गजनी’ बनवू शकते.
मेंदू नक्की काम कसं करतो?
अनेकांना हल्ली एखादी गोष्ट कुठे ठेवली, कोणाला फोन करायचा होता, काही वेळापूर्वी काय वाचलं किंवा पाहिलं हे आठवत नाही, अशी तक्रार असते. यामागे वाढत चाललेलं रील स्क्रोलिंग हे एक कारण असू शकतं, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. आपला मेंदू कोणतीही माहिती लक्षात ठेवण्यासाठी तीन टप्प्यांत काम करतो. यात प्रथम माहिती ग्रहण केली जाते, नंतर ती स्मरणात साठवली जाते आणि गरज पडल्यास पुन्हा आठवली जाते. मात्र रील्सच्या जगात प्रत्येक 15 ते 30 सेकंदांनी नवी माहिती, नवा चेहरा आणि नवा विषय समोर येत असल्याने मेंदूला एखादी गोष्ट नीट प्रोसेस करण्यासाठी पुरेसा वेळच मिळत नाही. यामुळे लक्ष विचलित होऊ लागतं आणि अनेक गोष्टी अल्पकालीन स्मरणशक्तीतही नीट साठवल्या जात नाहीत.
रिल्सचा मेंदूवर नेमका काय परिणाम होतो?
रील पाहताना मेंदूत ‘डोपामाइन’ नावाचे रसायन रिलीज होते, ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. मात्र, सतत नवीन कंटेंट पाहून मेंदूचा रिवॉर्ड सिस्टम थकून जातो. परिणामी, अभ्यास किंवा कामासारख्या गंभीर गोष्टी कंटाळवाण्या वाटू लागतात. सततच्या रील स्क्रोलिंगमुळे मेंदूला या झटपट मिळणाऱ्या आनंदाची सवय लागते. परिणामी पुस्तक वाचणं, अभ्यास करणं किंवा एखाद्या विषयावर सखोल विचार करणं यासारख्या गोष्टी कंटाळवाण्या वाटू लागतात. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होऊ लागते.
सकाळी पाहिलेली रील संध्याकाळपर्यंत विसरतो…
रील्स स्क्रोल करताना अनेक जण वेळेचं भान विसरतात. सकाळपासून रात्रीपर्यंत मधूनमधून रील्स पाहण्याची सवय लागते. त्यामुळे मेंदूला माहिती साठवण्यासाठी आणि आठवणी पक्क्या करण्यासाठी आवश्यक असलेला ‘रिकामा वेळ’ आणि विश्रांती मिळत नाही. याचा परिणाम असा होतो की, काही वेळापूर्वी पाहिलेली माहितीही लगेच विसरली जाते. अनेकांना “आत्ताच काय पाहिलं होतं?” असा प्रश्न पडतो.
‘डिजिटल अम्नेशिया’चा वाढता धोका
तज्ज्ञांच्या मते, स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे कोणतीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध असल्याने मेंदू स्वतः गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कमी करतो. यालाच ‘डिजिटल अम्नेशिया’ किंवा ‘गुगल इफेक्ट’ म्हटलं जातं. उदाहरणार्थ, पूर्वी अनेकांचे मोबाईल नंबर पाठ असायचे. आज स्वतःचा नंबर सोडला तर, जवळच्या व्यक्तीचाही नंबर अनेकांना आठवत नाही. कारण सर्व माहिती मोबाईलवर अवलंबून झाली आहे.
कायमस्वरूपी नुकसान होतं का?
याबाबत दिलासादायक बाब म्हणजे रील्स पाहिल्याने मेंदूचं कायमस्वरूपी नुकसान होतं, असं संशोधनातून स्पष्ट झालेलं नाही. मात्र अतिप्रमाणात रील्स, शॉर्ट्स किंवा तत्सम व्हिडीओ पाहिल्यास वर्किंग मेमरी आणि शॉर्ट-टर्म मेमरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
रिस्ल स्क्रोलिंगला ब्रेक कसा लावायचा ?
– रील्स पाहण्यासाठी वेळेची मर्यादा ठरवा.
– प्रत्येक 20 मिनिटांनंतर थोडा ब्रेक घ्या.
– झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल बाजूला ठेवा.
– पुस्तक वाचन, चालणं किंवा प्रत्यक्ष संवाद यांसारख्या सवयी वाढवा.
– मोबाईलच्या स्क्रीन टाइमवर नियमित लक्ष ठेवा.
रील्स हा मनोरंजनाचा चांगला पर्याय असला तरी त्याचं अतिरेकाचं व्यसन मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतं. फक्त अजून एक रील म्हणता म्हणता तास निघून जातात आणि त्याची किंमत आपली एकाग्रता, स्मरणशक्ती आणि मानसिक स्वास्थ्य मोजत असतं. त्यामुळे वेळेवर ब्रेक घेणं आणि डिजिटल वापरावर नियंत्रण ठेवणं आता काळाची गरज बनली आहे.