‘पगारवाढीने समस्या सुटणार नाही,’ लाईफ स्टाईल चेंज न करता पैसे वाचवा; 6 टिप्स चर्चेत

Money Saving Tips चांगली नोकरी आणि भरघोस पगार मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र पगार वाढला म्हणून आर्थिक अडचणी संपतातच असं नाही.

Money Saving Tips

Money Saving Tips

Money Saving Tips : महागाई वाढतेय, घरभाडं आणि प्रवासाचा खर्चही वाढतोय. अशा परिस्थितीत चांगला पगार असूनही अनेक नोकरदारांना महिन्याच्या शेवटी बचत करणं कठीण जातंय. मात्र बंगळुरूमधील एका तरुणाने लाइफस्टाइलमध्ये फारसा बदल न करता पैसे वाचवण्याचा एक वेगळाच फॉर्म्युला सांगितला आहे. त्याच्या या टिप्स सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. नेमकं असं या तरूणाने काय फॉर्म्युले सांगितले त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो का? जाणून घेऊया…

आजच्या काळात चांगली नोकरी आणि भरघोस पगार मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र पगार वाढला म्हणून आर्थिक अडचणी संपतातच असं नाही. घरभाडं, प्रवास, बाहेरचं खाणं, ऑनलाइन शॉपिंग आणि इतर छोट्या-मोठ्या खर्चांमुळे महिन्याचा पगार कधी संपतो, हे अनेकांना समजतही नाही. विशेषतः बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या नोकरदारांसाठी आर्थिक नियोजन करणं मोठं आव्हान ठरत आहे.

अशातच बंगळुरूमध्ये राहणाऱ्या अक्षय सी. एन. या तरुणाने पैसे वाचवण्याचे काही व्यावहारिक उपाय सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, बचत करण्यासाठी महागड्या सवयी सोडण्याची किंवा लाइफस्टाइल पूर्णपणे बदलण्याची गरज नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. आपल्या दैनंदिन सवयींमध्ये काही छोटे बदल करूनही चांगली बचत करता येऊ शकते, असा त्याचा अनुभव आहे.

लाईफ स्टाईल चेंज न करता पैसे वाचवण्याच्या 6 टिप्स…

1. पॉश एरिया सोडा, मेट्रो स्टेशनजवळ घर घ्या

अक्षयने बचतीसाठी केलेला पहिला बदल म्हणजे राहण्याचं ठिकाण. केवळ पॉश किंवा महागड्या परिसरात राहण्यापेक्षा मेट्रो स्टेशनच्या जवळ घर घेण्याला त्याने प्राधान्य दिलं. सुरुवातीला अशा घराचं भाडं थोडं जास्त वाटू शकतं. मात्र रोजच्या प्रवासासाठी लागणारा ऑटोचा खर्च, पेट्रोल आणि प्रवासात जाणारा वेळ यांची बचत होऊ शकते. त्यामुळे घर निवडताना केवळ भाडं न पाहता प्रवासाचा एकूण खर्चही लक्षात घ्यायला हवा, असं त्याचं म्हणणं आहे.

2. छोट्या-छोट्या खर्चांवर नियंत्रण ठेवा

आजकाल काही मिनिटांत घरपोच वस्तू मिळवून देणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि प्रत्येक छोट्या अंतरासाठी कॅब बुक करण्याची सवय अनेकांना लागली आहे. मात्र, या छोट्या खर्चांची बेरीज महिन्याच्या शेवटी मोठी होते. त्यामुळे अक्षयने गरज नसताना ऑनलाइन ऑर्डर करणं आणि प्रत्येक वेळी कॅबचा वापर करणं कमी केलं. सोयीसाठी होणारा अनावश्यक खर्च टाळल्यास चांगली बचत होऊ शकते.

3. वीकेंडचं प्लॅनिंग आधीच करा

अनेकजण आठवडाभर काम केल्यानंतर वीकेंडला अचानक बाहेर जाण्याचा प्लॅन करतात. कधी कॅफे, कधी रेस्टॉरंट, तर कधी मित्रांसोबत पार्टी. अशा वेळी खर्चाचं कोणतंही नियोजन नसल्याने बजेट बिघडतं. अक्षयने मात्र, वीकेंडचे प्लॅन आधीच ठरवायला सुरुवात केली. त्यामुळे अचानक होणारी धावपळ आणि अनावश्यक खर्च टाळता येऊ लागला. मनोरंजनासाठी खर्च करणं चुकीचं नाही, मात्र त्याचं नियोजन असणं गरजेचं आहे.

4. दुसऱ्यांचं पाहून गॅजेट्स खरेदी करू नका

कॉर्पोरेट क्षेत्रात अनेकदा सहकाऱ्यांकडे नवीन फोन, लॅपटॉप किंवा महागडे गॅजेट्स पाहून आपल्यालाही अशा वस्तू खरेदी करण्याची इच्छा होते. मात्र, केवळ ट्रेंडमध्ये राहण्यासाठी किंवा इतरांना दाखवण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करणं आर्थिकदृष्ट्या योग्य नाही. अक्षयने अशा दिखाव्याच्या खरेदीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. गरज असेल तेव्हाच नवीन वस्तू खरेदी करण्यावर त्याने भर दिला.

5. रोज बाहेरून जेवण्यापेक्षा घरचं जेवण खा

ऑफिसच्या कामाच्या धावपळीत अनेकजण रोज ऑनलाइन फूड ऑर्डर करतात किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवतात. मात्र यामुळे महिन्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. अक्षयने बाहेरचं जेवण कमी करून घरच्या घरी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. यामुळे पैशांची बचत होण्यासोबतच खाण्याच्या सवयींमध्येही सुधारणा होऊ शकते. रोजच्या जेवणाचा खर्च कमी करण्यासाठी हा एक सोपा उपाय ठरू शकतो.

6. पगारापेक्षा खर्चाच्या सवयी महत्त्वाच्या

अक्षयने सांगितलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ पगार वाढल्याने आर्थिक समस्या सुटत नाहीत. कारण उत्पन्न वाढलं की अनेकदा खर्चही त्याच प्रमाणात वाढू लागतात. त्यामुळे कितीही मोठा पगार असला, तरी खर्च करण्याच्या सवयी योग्य नसतील तर बचत करणं कठीणच आहे. अनावश्यक खर्च ओळखणं, गरज आणि हौस यातील फरक समजून घेणं आणि पैशांचं नियोजन करणं अधिक महत्त्वाचं आहे.

सोशल मीडियावर अक्षयच्या टिप्सची चर्चा

अक्षयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या अनुभवांची सध्या चर्चा होत आहे. अनेकांनी त्याच्या व्यावहारिक टिप्सचं कौतुक केलं असून, आपल्या दैनंदिन आयुष्यातही अशा सवयींचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली आहे. पैसे वाचवण्यासाठी प्रत्येक वेळी मोठे आर्थिक निर्णय घेण्याची गरज नसते. घराचं योग्य नियोजन, प्रवासाचा खर्च, खरेदीच्या सवयी आणि रोजच्या जेवणावर नियंत्रण ठेवलं, तरी बचतीला सुरुवात होऊ शकते. कारण आर्थिक स्थैर्य केवळ किती पैसे कमावता यावर ठरत नाही, तर कमावलेल्या पैशांचं नियोजन किती चांगल्या प्रकारे करता यावरही अवलंबून असतं.

Exit mobile version